| सावंतवाडी | वृत्तसंस्था |
लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीसाठी शिवसेना आणि भाजपमधील रस्सीखेच सुरूच असली, तरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. शिवसेनेतून उमेदवारीसाठी चर्चेत असलेले किरण ऊर्फ भैय्या सामंत गेले दोन दिवस मुंबईत ठाण मांडून असून त्यांच्याकडूनही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत; मात्र राणे उमेदवार आहेत, असे गृहीत धरून भाजपने प्रचारात मुसंडी मारली आहे.
महायुतीमध्ये लोकसभेच्या नऊ मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यात रत्नागिरी-सिंधुदुर्गचा समावेश आहे. येथून कमळ चिन्हावर उमेदवार उभा करण्यावर भाजप सुरुवातीपासून ठाम आहे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रभाव टाकू शकणारा उमेदवार द्यावा लागणार असल्याने केंद्रीय मंत्री राणे यांचे नाव पुढे आले.
हा मतदारसंघ पूर्वीच्या युतीच्या जागावाटपात शिवसेनेकडे असल्याने शिंदे यांच्या पक्षानेही यावर दावा केला आहे. त्यांच्यातर्फे किरण सामंत यांचे नाव चर्चेत आले. महायुतीतील या चढाओढीत उमेदवारी कोणाला द्यायची, यावरून तिढा अद्याप कायम आहे. शिवसेनेचे सामंत दोन दिवस मुंबईत आहेत. त्यांनी दोन्ही पक्षांतील वरिष्ठांच्या गाठीभेटी घेतल्याचे समजते. यात शिवसेनेने पुन्हा एकदा उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे.