| नाशिक | प्रतिनिधी |
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीत अजूनही उमेदवार ठरलेला नाही. त्यातच काल बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी नाशिकच्या जागेवर प्रीतम मुंडेंना उभे करेल, असे म्हटले. यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी पंकजा मुंडेंना टोला लगावला आहे. पंकजा मुंडे यांनी म्हटले होते की, मला बीडमधून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे प्रीतम मुंडेंचे काय होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्रीतम मुंडे यांची काळजी करू नका. मी तिला नाशिकमधून उभी करेन, असे वक्तव्य त्यांनी केले होते. यामुळे महायुतीत मोठी खळबळ उडाली आहे.
पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर छगन भुजबळ म्हणाले की, पंकजा मुंडे यांनी आपल्या निवडणुकीत लक्ष द्यावे. आमच्याकडे उमेदवार नाहीत, असे नाही. नाशिकमध्ये तिन्ही पक्षात खूप उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांनी बीडमध्ये लक्ष द्यावे, असा टोला त्यांनी लगावला आहे. यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीतील दोन ओबीसी नेत्यांमध्ये जुंपल्याचे चित्र आहे.
नाशिकवर राष्ट्रवादीचा दावा कायम छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली असली तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने या जागेवरील दावा अद्याप सोडलेला नाही. छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, नाशिक लोकसभेसाठी आमच्याकडे अनेक उमेदवार आहेत. तसेच राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी देखील नाशिकच्या जागेसाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढणार, असे म्हटले आहे. यामुळे आता नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी, शिवसेना की भाजपला मिळणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.






