| आगरदांडा | प्रतिनिधी |
भारत निवडणूक आयोग यांचे निर्देशान्वये व जिल्हाधिकारी अलिबाग रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड शहरात स्वीप कार्यक्रम राबविण्यात येत आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये शहरातील मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून स्वीप कार्यक्रमांतर्गत नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, पाणी पुरवठा व सफाई कर्मचारी यांनी बाईकला मतदाना विषयी जनजागृतीपर संदेश लावून शहरात बाईक रॅली काढली.
रायगड लोकसभा मतदार संघात 7 मे रोजी मतदान असून या दिवशी सर्वाना मतदान करता यावे म्हणुन सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोणती ही सबब न देता सर्व जागरुक मतदारांनी कुठल्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करावे व निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजवावा असे मुरूड जंजिरा नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी पंकज अनिल भुसे यांनी याप्रसंगी मतदारांना आवाहन केले.
सदर रॅलीमध्ये नगरपरिषदेचे पाणी पुरवठा व आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी सोबतच आरोग्य निरीक्षक राकेश पाटील, प्रशासकीय अधिकारी परेश कुंभार, लिपीक मनोज पुलेकर, संजय वेटकोळी, संजय बामगुडे, सतेज निमकर, मुकादम अभिजीत चांदारेकर, सिटी को-ऑडर्डीनेटर सचिन कोरके आदींसह सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.