| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे रुग्णांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसलेल्या सेवांकरीता सामंजस्य कराराद्वारे अतिविशेषतज्ञांच्या सहकार्याने युरोलॉजी (मूत्रविकार), ओरल कॅन्सर (मुख कर्करोग) व इंटरवेंशनल रेडिओलॉजीच्या संदर्भातील रुग्णाना बाह्य रूग्ण विभागात मोफत सेवा सुरू करण्यात आली आहे.
मूत्रमार्गसंस्थेशी निगडित असलेले मुख्य आजार जसे की, वयोमानाने पुरुषांमध्ये आढळणारा प्रोस्टेट ग्रंथीचे आजार, आपल्या परिसरात सामान्य असणारा मुतखडा, स्त्रियांमध्ये वारंवार होणारे लघवीचे संसर्ग तसेच लहान मुलांमध्ये जन्मतः असणारे मूत्रमार्गाचे विकार याबाबत योग्य मार्गदर्शन, उपचार व सल्ला देणेसाठी अलिबागमधील प्रसिद्ध मूत्रशल्यचिकित्सक डॉ. दशरथ घुगे हे आठवड्यातील दर गुरुवारी दुपारी दोन वाजता जिल्हा रुग्णालयातील ओपिडी क्रमांक 08 येथे सेवा देत आहेत. तर, पायातील रक्तवाहिनी संदर्भाजरल आजार, डायलेसिससाठी आवश्यक वृक्कविकारशास्त्र, न भरणारी जखम, स्तन, फुफ्फुसातील जखमांसंदर्भात बायोप्सी व तपासणी तसेच यकृत, हातापायातील रक्तवाहिनी, मेंदूतील रक्तस्त्राव व स्ट्रोक संदर्भातील तपासणी करण्यासाठी डॉ. अक्षय गुरसाळे, रक्तवाहिनी चिकित्सक हे महिन्याच्या दुसर्या व चौथ्या गुरुवारी दुपारी दोन वाजता जिल्हा रुग्णालयातील ओपिडी क्रमांक 03 येथे सेवा देत आहेत. तसेच मुख कर्करोग संबंधित तपासणी व उपचार तसेच मुख कर्करोग पूर्व होणारे आजार जसे की, पांढरा चट्टा, लाल चट्टा, तोंड न उघडणे, तोंडातील न भरणारी जखम, मुख कर्करोग निदान व शस्त्रक्रिया, जबड्याचे फ्रॅक्चर, अपघातग्रस्त रुग्णांच्या जबड्यावरील तसेच जबड्यातील गाठीची उपचारशस्त्रक्रिया व खालच्या जबड्याचे जॉइन्ट संबंधित आजारवर निदान व उपचार करण्यासाठी मुख कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. सौजन्य सुहास साईकर हे महिन्याच्या पहिल्या व तिसर्या गुरुवारी सकाळी दहा वाजता जिल्हा रुग्णालयातील ओपीडी क्रमांक 15 येथे सेवा देत आहेत. तरी वरील सर्व आजारासंदर्भात निगडीत रुग्णांनी या मोफत उपचार व सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी-घुगे यांनी केले आहे.