शिबिराला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद
। पनवेल । वार्ताहर ।
उन्हाळी सुट्ट्यांचा सदुपयोग व्हावा या प्रामाणिक भावनेतून तालुका क्रीडा अधिकारी मनीषा मानकर यांनी खो-खो प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर हे पूर्णपणे विनमुल्य आहे. मनीषा मानकर यांच्या माध्यमातून इतर वेळेस देखील सायंकाळच्या सत्रांमध्ये शाळकरी मुलांकरता खो-खोचे विनामूल्य प्रशिक्षण शिबिर चालविले जाते. 5 मे पर्यंत चालणार्या या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे.
तालुका क्रीडा केंद्राच्या क्रीडांगणावर दोन खो-खोचे कोर्ट उभारण्यात आले असून येथे अत्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने मुलांना खो-खोचे प्रशिक्षण दिले जाते. सीनियर केजी पासून ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी या प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत. सध्या या ठिकाणी 50 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. यातील पाच खेळाडू जरी जिल्हा पातळीपर्यंत पोहोचले तरी आमच्या प्रयत्नांना यश आल्याचे आम्ही समजू अशी प्रतिक्रिया मनीषा मानकर यांनी दिली. त्यापुढे म्हणाल्या की, 15 दिवस हे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर चालणार आहे. सुट्ट्यांचा सदुपयोग, खेळाशी ओळख आणि फिटनेस अशी तिहेरी उद्दिष्टे या शिबिराच्या माध्यमातून साध्य करण्याचा आमचा मानस आहे. या शिबिरातील सगळ्यात लहान असणारी स्वरा धार्मिक या मुलीची आई स्वाती धार्मिक यांनी कृषीवल प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, या शिबिराचा स्वराला खूप चांगला फायदा होत आहे. तिची एनर्जी लेव्हल वाढत आहे. तिला या खेळाची गोडी निर्माण झाली आहे. ती या खेळात इतकी रममाण झाली आहे की कधीही खाडा होऊ देत नाही. तसेच, अंश पाटील या विद्यार्थ्याची आई प्रीती पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले की, या शिबिरामुळे अंशचे कॉन्सन्ट्रेशन वाढत आहे. तसेच, त्याच्या ठाई शिस्त बळावते आहे.