| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जतकरांचे ग्रामदैवत श्री धापया महाराज यांचा उत्सव अक्षय तृतिये पासून सुरू झाला. त्या निमित्ताने शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असलेला कुस्तीच्या आखाड्यात शेवटची कुस्ती हरियाणाचे संदीप चहर हरियाणा आणि पुण्याचे भरत लोकरे यांच्यात चांगलीच रंगली. चहरने भरत याला चितपट केल्याने तो अजिंक्य ठरला. युवराज भगत याने तीन तर लक्ष मढवी याने चार कुस्त्या चीतपट करीत उपस्थित कुस्ती प्रेमींचे मन जिंकले.
धापया आखाड्यात सकाळी नऊ वाजल्या पासून स्थानिक स्थानिक कुस्तीगीरांमध्ये कुस्ती होऊन कुस्त्यांना प्रारंभ झाला. कर्जत तालुका कुस्तीगीरी अध्यक्ष श्री भगवान धुळे यांच्या हस्ते उद्घघाटन झाले. याप्रसंगी जेष्ठ पंच मारुती ठाकरे, देवस्थानचे अध्यक्ष गणेश शिंदे, महेंद्र चंदन, मनोज वरसोलिकर, सचिन दगडे, गौरव भानुसघरे, हेमंत पवार, अमित गुप्ता, प्रशांत पाटील, मलेश भोईर आदी उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात 52 कुस्त्या झाल्या. तर दुपारच्या सत्रात 42 कुस्त्या झाल्या. आशा एकूण 94 कुस्त्या झाल्या. सकाळच्या सत्रात विजय ठोंबरे विजेता ठरला. त्याला रोख पारितोषिक देण्यात आले. भगवान धुळे यांनी त्याला गदा देऊन सन्मानित केले. अंतिम कुस्ती हरियाणाचे संदीप चहर हरियाणा आणि पुण्याचे भरत लोकरे यांच्यात चांगलीच रंगली. चहरने भरत याला चितपट केल्याने तो अजिंक्य ठरला. शेवटच्या कुस्तीसाठी नितीन सावंत यांनी अकरा हजार रुपयांचे पारितोषिक ठेवले होते. मात्र अन्य दानशुरांनी रोख बक्षीसे जाहीर केल्याने या कुस्तीच्या पारितोषिकही रक्कम सोळा हजार रुपयांवर गेली. तसेच भगवान धुळे यांनी आखाडा विजेता चहर याला सुध्दा गदा देवून सन्मानित केले. परभणीच्या अंकुश खांडेकर चित्तथरारक योग प्रात्यक्षिके सादर करून उपस्थिताची दाद मिळविली. दोन्ही सत्रात पंच म्हणून दीपक भुसारी, दत्तात्रय म्हसे, रमेश लोभी, वासुदेव भगत यांनी काम पाहिले.
102 वर्षांचे कुस्ती पंच मारुती ठाकरे यांचा तसेच दत्तात्रेय पालांडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. श्रीराम पाटील यांनी संपूर्ण दिवस सर्वच कुस्त्यांचे समालोचन कुस्तीचा इतिहास सांगत विविध किस्से सांगत उपस्थितांचे आठवणींना उजाळा दिला. दिलीप ठाकरे यांनी सूत्र संचालन केले. या आखाड्यात रोख पारितोषिके देण्यासाठी पपू गुरव, मंगेश देशमुख, अमित गुप्ता, पंकज बडेकर, योगेश देशमुख, सुवर्णा जोशी, महेंद्र चंदन, नितीन गुप्ता, अभिजित मुधोळकर, बंटी गुप्ता आदींनी सहकार्य केले.
माजी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, माजी नगरसेवक नितीन सावंत, निलेश घरत, मुकेश पाटील, कैलास गायकवाड, अशोक शिंदे, प्रकाश आणेकर आदींच्य हस्ते जिंकलेल्या कुस्तीगिरांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी दिल्ली, हरियाणा, मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, नाशिक, अहमदनगर आदी भागांतून आलेले पहेलवान या कुस्ती स्पर्धेत सहभागी झाले होते. कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागातून आलेले असंख्य कुस्ती प्रेमी यावेळी उपस्थित होते.