मोदी है तो मुमकिन है…
| धुळे | वृत्तसंस्था |
मनमाड-इंदूर रेल्वेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यामुळे मी रेल्वेची वाट बघत थांबलो होतो. कारण ‘मोदी है तो मुमकिन है’. त्यामुळे सभेला येण्यास उशीर झाला. म्हणून मी आपली दिलगिरी व्यक्त करतो, असा उपरोधिक टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजपला लगावला.
धुळे लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सकाळी शहरातील इंदिरा गार्डन परिसरात सभा झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, उमेदवार डॉ. शोभा बच्छाव, माजी आमदार सुधीर तांबे, अश्विनी पाटील, प्रतिभा शिंदे, माजी आमदार शरद पाटील, प्रथम महापौर भगवान करणकाळ, युवराज करणकाळ, महेश मिस्तरी, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले, डॉ. दरबारसिंग गिरासे, अनिल भामरे आदी उपस्थित होते.
खासदार डॉ. कोल्हे पुढे म्हणाले, की अनेक ठिकाणी पंतप्रधानांकडे बघून मतदान करा, असे सांगितले जात आहे. पण सोयरीक जुळवताना बापाच्या कर्तृत्वाकडे नव्हे, तर मुलाकडे बघावं लागतं. तुम्ही पंतप्रधान नव्हे तर, खासदार निवडत असल्याची आठवण डॉ. कोल्हे यांनी यावेळी करून दिली. काँग्रेसच्या काळात देशावर 54 लाख कोटी रुपयांचा कर्ज होतं. पण भाजपच्या मागील दहा वर्षांच्या कार्यकाळात हे कर्ज 205 लाख कोटी झाले आहे. आज डोक्यावर दीड लाखांचे कर्ज घेऊन बाळ जन्माला येते आहे. देशावरील एकूण कर्ज सकल उत्पादनाच्या 80 टक्के आहे. ही बाब अत्यंत धोकेदायक आहे.
मतदानाच्या पाच मिनिटांत देशाची पुढील सत्ता, पाच वर्षे कोणाच्या हाती ते ठरणार आहे. या पाच मिनिटांत वाढलेले सिलिंडरचे भाव आठवावे. चिरडलेले शेतकरी आंदोलन, महिला कुस्तीपटूंना रस्त्यावरून फरपटत नेणे, तसेच मणिपूरची घटना आठवावी. कारण ‘सिर्फ हात बदलेगा हालात’ असे म्हणत डॉ. अमोल कोल्हे यांनी डॉ. शोभा बच्छाव यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी केले.
दरडोई उत्पन्नावर मोदींनी बोलावे पंतप्रधान अर्थव्यवस्थेवर बोलतात, पण दरडोई उत्पन्नावर बोलत नाही. जनतेच्या डोळ्यात धूळफेक होत आहे. मात्र आता जनतेच्या लक्षात येऊ लागल्यानंतर पंतप्रधानांची भाषा बदलली आहे. ते धार्मिक तेढ करणारी भाषणे करत आहेत. पोटातल्या आगीला धर्माची भाषा ठाऊक नसते. श्रीरामावर आमचीही श्रद्धा आहे. पण पोकळ घोषणांचा उपयोग काय, असा सवालही डॉ. कोल्हे यांनी भाजपला विचारला.







