| रायगड | खास प्रतिनिधी |
राज्य सरकारच्या आदेशानुसार 1 जूनपासून समुद्रात मासेमारी करता येणार नाही. हा बंदी कालावधी 31 जुलैपर्यंत लागू करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणातील विविध समुद्र, खाडी किनारी नौका विसावू लागल्या आहेत. या कालावधीत आदेशाचे उल्लंघन केल्यास मच्छिमारांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मत्स्य विभागाने स्पष्ट केले आहे.
भारताच्या पूर्व किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन लवकर होत असल्यामुळे या किनारपट्टीवर मासेमारी बंदी कालावधी 15 एप्रिल ते 14 जून तसेच पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी बंदी कालावधी 1 जून ते 31 जुलै 2024 असा आहे. या कालावधीत पावसाळी मासेमारी बंदी करण्यात आली आहे. या कालावधीत मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेला वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. तसेच या कालावधीत खराब व वादळी हवामानामुळे होणारी मच्छिमारांची जीवित व वित्तहानी मासेमारी बंदीमुळे टाळता येणे शक्य होते. ही बंदी यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहणार आहे. समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौका 1 जूनपूर्वी बंदरात परतणे बंधनकारक आहे; तसेच 31 जुलैपूर्वी समुद्रात मासेमारीसाठी कोणालाही जाता येणार नाही, असे मत्स्य विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.