| पुणे | वृत्तसंस्था |
पुणे शहरात पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. कल्याणीनगर येथे शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण अपघातात तरुण-तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एका अलिशान कारने दुचाकीला चिरडल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, ती कार पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाचा अल्पवयीन मुलगा चालवत असल्याचे समझले आहे. अपघात करणाऱ्या अल्पवयीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे.
कल्याणीनगर येथील एका हॉटेलमधून अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा हे दोघे जण शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पार्टी करून दुचाकीवरून घरी निघाले होते. हॉटेलपासून काही अंतर पुढे आल्यावर लॅन्डमार्क सोसायटी जवळ ग्रे कलरच्या दोन्ही बाजूस नंबरप्लेट नसलेल्या पोर्शे कारने यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत दोघे जण रस्त्याच्या बाजूला पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. कार चालवणारा चालक पुण्यातील एका बड्या व्यावसायिकाचा मुलगा (वय 17 वर्ष) असल्याचे समझले आहे. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.







