अवकाळीतही दरडी कोसळण्याच्या घटना; आपत्तीपुर्वी घाटबंदीची गरज
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून पोलादपूर, महाबळेश्वर, वाई, सुरूर मार्गावरील आंबेनळी घाटामध्ये 2021मध्ये मोठया प्रमाणात भुस्खलनाच्या घटना अतिवृष्टीदरम्यान झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने महाबळेश्वर ते प्रतापगडदरम्यानच्या रस्त्याचे मजबुतीकरण आणि दरडप्रवण क्षेत्रातील बंदिस्ती व बांधकामांची पूर्तता केली आहे. मात्र, रायगड जिल्ह्यातील पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाने केलेल्या दरडप्रवण क्षेत्रातील कामांखेरीज अनेक ठिकाणी भुस्खलनाचा धोका दिसून येत असल्याने मोठ्या आपत्तीपूर्वी आंबेनळी घाट वाहतुकीस बंद ठेवण्याची गरज दिसून येत आहे. गेल्या सात दिवसांतील अवकाळी पावसामुळे आंबेनळी घाटामध्ये काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना झाल्याचे दिसून येत आहे.
पोलादपूर तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या तुलनेमध्ये पोलादपूर, महाबळेश्वर, वाई, सुरूर राज्यमार्गावर दरडी कोसळण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून वाढले असल्याचे दिसून आले आहे. पोलादपूर तालुक्यामध्ये जेसीबी आणि डम्पर यांची संख्या वाढीस लागल्यापासून पावसाळी ठेकेदारांना ’स्लॅक सीझन’ ऐवजी ’एक्स्ट्रा इन्कम’ करण्याची संधी दरडी कोसळण्यामुळे होत असते. 2021 मध्ये दरडी कोसळल्याच्या ठिकाणांपेक्षाही अधिक ठिकाणी कार्यकर्त्यांनी पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या मदतीने दरडी हटविण्याचे काम केल्याची बिले काढल्याने ज्या ठेकेदाराच्या नावाने ही बिले काढली त्याला आणि त्याचा मुलगा, पत्नी व भगिनी यांच्या नावानेही कोट्यवधी रूपयांची बिले अदा केल्याची माहिती माहितीच्या अधिकाराद्वारे प्राप्त झाली.
यंदादेखील आगामी पावसाळयामध्ये दरडी व मातीचे ढिगारे कोसळण्याची शक्यता असल्याने काही दरडप्रवण क्षेत्रांच्या तळाशी रस्त्यालगत काँक्रीटच्या भिंती उभारण्यात आल्या आहेत तर काही मातीचे ढिगारे कोसळू शकतील, अशा ठिकाणी गॅबियन पध्दतीच्या लोखंडी जाळी आणि दगडाच्या खापरांच्या भिंती उभ्या करण्यात आल्या आहेत. या दोनप्रकारच्या भिंती का उभारण्यात आल्या आहेत आणि त्यामुळे त्या डोंगरउतारावरील दरडी अथवा मातीचे ढिगारे कोसळण्यास प्रतिबंध कितपत होऊ शकेल, याबाबतील अभियांत्रिकी कारणमिमांसा करण्याची सार्वजनिक बांधकाम उपविभागाला कोणतीही आवश्यकता दिसून येत नसल्याची भुमिका या विभागाकडून दिसून येत आहे.
पोलादपूर तालुक्यात काळकाईं मंदिर ते वाडा कुंभरोशी दरम्यानच्या दरडी कोसळण्याच्या घटनेवेळी रस्त्याला देखील तडे गेल्याचे दिसून आले. मात्र, त्याठिकाणी डोंगरउतारावरचे ढिगारे भविष्यात कोसळण्याची शक्यता कायम राहिली आहे. आंबेमाची, दाभिळ, पायटा आणि कुंभळवणेपर्यंतच्या भागात मातीचे ढिगारे आणि मोठया दरडी कोसळण्याची शक्यता दिसून येत आहे. काही ठिकाणी गांडूळकीची म्हणजेच भुसभुशीत माती असल्याने तर काही ठिकाणी डोंगरालगतची लालमाती उकरल्याने नव्याने दरडप्रवण क्षेत्र तयार झाले आहे. पोलादपूर तालुक्याच्या आंबेनळी घाटाच्या हद्दीत सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत अनेक प्रकारची बांधकामे गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये झाली असून या कामांच्या ठिकाणीदेखील दरडी कोसळू शकतील, अशी परिस्थिती आगामी पावसाळयात घडू शकणार आहे. यामुळे नजिकच्या काळामध्ये मोठी दूर्घटना घडून अथवा दरडी कोसळून काही काळ घाटबंद ठेवण्यापेक्षा संपूर्ण कामे उरकून अथवा जेवढया दरडी कोसळण्याची शक्यता आहे; त्याठिकाणी भुस्खलन झाल्यानंतरच आंबेनळी घाटातील वाहतुक सुरू केल्यास रस्ते सुरक्षिततेची पूर्वदक्षता घेता येणार आहे.