| उरण | वार्ताहर |
मातीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील डंपरने वासराला उडवण्याची घटना रानसई खैरकाठी रस्त्यावर घडली आहे. या अपघातात वासरू जखमी झाल्याची माहिती प्राणी मित्रांना कळताच त्यांनी जखमी वासरावर औषध उपचार केले आहेत.
महसूल व वन विभागाने उरण तालुक्यातील वनराई परिसरातून माती उत्खनन करण्याचा ठेका हा माती चोर माफियांना कोणत्याही प्रकारची जागेवर जाऊन पाहणी न करता दिला आहे. त्यामुळे सदर माती चोर माफिये पैशाच्या जोरावर वनसंपदेचा ऱ्हास करताना दिसत आहेत. त्यात काही माती चोर माफियांनी आपला मोर्चा हा रानसई, चिर्ले, चिरनेर, विंधणे ग्रामपंचायत हद्दीत वळविला आहे. मातीची अवैध वाहतूक करणाऱ्या एका डंपरने रविवारी (दि.9) आपली तहान भूक भागविण्यासाठी जाणाऱ्या एका वासराला उडविण्याची घटना घडली. या झालेल्या अपघात वासरू जखमी झाल्याने डँम्पर चालकांनी पळ काढला आहे. या अपघाताची माहिती वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे सदस्य काशिनाथ खारपाटील यांना मिळताच त्यांनी चिरनेर येथील पशु वैद्यकीय कर्मचारी प्रमोद मोकळ यांच्या कडून प्रथमोपचार करून घेतले. मात्र, माती चोर माफिये पैशाच्या जोरावर वनसंपदेचा ऱ्हास करुन माणसाप्रमाणे मुक्या प्राण्यांना बेधडक त्यांच्याही जीवनाशी खेळत असतील तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न प्राणी पक्षी मित्र महसूल व वन विभागाला विचारत आहेत.







