जिल्हा कारागृह आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा उपक्रम
| अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्हा कारागृहातील कैद्यांसाठी आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीराचे आयोजन शनिवारी (दि.8) कारागृहात करण्यात आले. या शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून 181 कैद्यांची तपासणी करून त्यांना तज्ञांकडून मार्गदर्शऩ करण्यात आले. यामध्ये 12 महिला कैद्यांचा समावेश होता. अलिबागमधील जिल्हा कारागृह आणि अलिबागमधील सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय यांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर, उपमहानिरीक्षक योगेश देसाई, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच, अलिबागमधील सहाय्यक धर्मदाय आयुक्त प्रताप सातव व निरीक्षक सूनील साळुंखे यांच्या सहाय्याने मोफत आरोग्य वैद्यकिय तपासणी व औषधोपचार शिबीर भरविण्यात आले.
या शिबीरामध्ये कामोठे येथील एमजीएम रुग्णालय, डॉ. जी. डी. पोळ फाऊंडेशन, वाय.एम.टी आयुर्वेदीक मेडीकल कॉलेज खारघर, वाय. एम. टी होमीओपॅथिक मेडीतल कॉलेज व हॉस्पीटल खारघर, वाय. एम.टी. दंतवैद्य हॉस्पीटल खारघर, लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल, पटवर्धन हॉस्पीटल पनवेल, या नामंकित वैद्यकिय संस्थामधील तज्ञ वैद्यकिय अधिकारी यांनी अलिबागमधील जिल्हा कारागृहातील कैद्यांची सर्वसाधारण आजार, नेत्र, नाक, कान, त्वचारोग, दंत चिकित्सा तसेच महिला कैद्याची स्त्रीरोग विषयक वैद्यकिय तपासणी केली. यावेळी कैद्यांना मार्गदर्शन करून त्यांना मोफत औषधे वाटप केली. कारागृहातील 169 पुरुष व 12 महिला कैद्यांनी या शिबीरात सहभाग घेतला. शिबीर यशस्वी होण्यासाठी जिल्हा कारागृह अधिक्षक अशोक कारकर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी रामचंद्र रणनवरे, तुरुंगाधिकारी शशीकांत निकम, किशोर वारगे, विलास इंगळे, देवलाल शिरसाठ, सुभेदार सुनील जाधव, अशोक तांडेल, हवालदार समीर ठोंबरे, वैभव वारंग, गणेश राठोड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.