। ठाणे । वृत्तसंस्था ।
वर्तकनगर येथे डंपरची दुचाकीला धडक लागून दोघांचा मृत्यू झाला आहे. यात पोलीस कॉन्स्टेबलसह एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
वर्तकनगर भागात कार्यरत असणारे ठाणे क्राईम ब्रांचचे पोलीस कॉन्स्टेबल सुनील रावते (44) बुधवारी (दि.12) एका महिलेसोबत दुचाकीवरून खासगी कामासाठी जात होते. वर्तकनगर येथील कोरस भाग दरम्यान एका डंपरची दुचाकीला धडक लागली. त्याचवेळी अंगावरून डंपर गेल्याने रावते आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला.
अपघात नेमका कसा झाला आहे हे अद्याप समझू शकले नाही. अपघाताची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून दोघांचेही मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. दोघांच्या मृत्यूने वर्तकनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.