। लाहोर । वृत्तसंस्था ।
मितभाषी असा स्वभाव असलेले पाकिस्तान संघाचे नवे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनाही पाक संघातील वातावरणावर भाष्य करण्यावरून स्वतःला रोखता आले नाही. विखुरलेला संघ अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.
भारताच्या 2011 मधील विश्वकरंडक विजेत्या संघाचे प्रशिक्षक असलेले कर्स्टन यांनी मे महिन्यात पार पडलेल्या आयपीएलनंतर पाक संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली होती. पाकचा संघ विश्वकरंडक स्पर्धेस रवाना होण्यापूर्वी कर्स्टन यांनी खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता विश्वकरंडक स्पर्धेतील अनुभवानंतर कर्स्टन यांनी हा एकसंध असलेला संघ नाही. मोठ्या प्रमाणात दुफळी असून गटबाजी आहे. कोणी कोणाला सहाय्य करत नाही. प्रत्येक जण वेगवेगळ्या असल्याचा सारखा वागतो. मी अनेक संघासोबत राहिलो आहे, पण अशी परिस्थिती पाहिलेली नाही, अशा तीव्र शब्दात कर्स्टन यांनी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. मुळात स्पर्धेस रवाना होण्यापूर्वीच कर्स्टन यांनी बहुतांशी खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. संघात अनुभवी खेळाडू असूनही त्यांची तंदुरुस्ती जागतिक दर्जापेक्षा फार पाठीमागे आहे, असे ते म्हणाले होते.