शैक्षणिक साहित्य विक्रेते चिंतेत
| महाड | वार्ताहर |
नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले असल्याने शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारात पालकांची लगबग सुरु झाली आहे. प्रतिवर्षी शैक्षणिक साहित्याच्या किमतीत होणारी वाढ यावर्षीदेखील थांबली नाही. नियमित वापरातील वह्यांच्या किमतीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. तर अन्य शैक्षणिक साहित्य, गणवेश, विद्यार्थी वाहन फी, प्रवेश फी यामधील वाढ पालकवर्गात चिंता निर्माण करणारी आहे.
नुकत्याच शाळा सुरु झाल्या आहेत. यामुळे पालक वर्गाची आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी धावपळ सुरु आहे. त्याचबरोबर शैक्षणिक वर्षात लागणार्या साहित्याच्या खरेदीसाठीदेखील लगबग सुरु आहे. महाड बाजारपेठेत सध्या शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी लगबग सुरु झाली आहे. गेली कांही वर्षापासून काही शाळा शैक्षणिक साहित्य शाळेतूनच घेण्याचा आग्रह करत असले तरी विविध वह्या, पुस्तके, गाईड्स, आणि पावसाळी चप्पल, दफ्तर, घेण्यासाठी बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे. शासनाने शिक्षण संस्थाना कितीही नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला तरी आजही शाळांमधून शैक्षणिक साहित्य विक्री केली जात आहे. यामुळे बाजारपेठेत शैक्षणिक साहित्य विक्रीवर परिणाम जाणवू लागला आहे.
यावर्षी नियमित आकाराच्या वह्यांमध्ये किमान 15 ते 25 रुपयांची वाढ झाली आहे. पाल्यांच्या शिक्षणासाठी धडपड करणार्या पालकांचा या वस्तू खरेदीकडे असलेला कल वाढला आहे. शाळा आणि कॉलेजकरिता लागणारे नोटबुक, लाँग बुक, कंपास, कवर रोल, यामध्येदेखील वाढ झाली आहे. यापूर्वी 40 ते 60 दरम्यान मिळणारी कंपास पेटी आता 80 ते 130 पर्यंत मिळत आहे. तर अन्य शैक्षणिक साहित्यातदेखील किमान 25 ते 30 रुपयाची दर वाढ झाली आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी वह्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर इतर शैक्षणिक साहित्याच्या किमतीदेखील वाढल्या आहेत. शाळांमधून वह्या पुरवल्या जात असल्या तरी ग्राहक विविध दर्जाच्या वह्या पाहण्यास येतो. मात्र, शैक्षणिक साहित्य शाळेतच मिळत असल्याने स्टेशनरी व्यवसाय धोक्यात आला आहे.
मुबीन देशमुख,
स्मार्ट स्टोर्स,
महाड