। पनवेल । वार्ताहर ।
सकाळ पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कळंबोली वसाहतीमधील अनेक भागात पाणी साचले आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी वाहन बंद पडून वाहतूक कोंडी झाल्याने सामान्य नागरिकांना रस्त्यावर चालणे देखील अवघड झाले होते. तसेच, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वसाहतीत नाले सफाईचे काम प्रशासनाकडून करण्यात येत असते. नाले सफाईच्या कामामुळे यंदा पाणी तुंबण्याचे प्रकार घडणार नाहीत असे दावे प्रशासनाकडून करण्यात येत होते. परंतु, प्रशासनकडून करण्यात येणारे हे दावे फोल ठरल्याचे दिसून येत आहे. यावेळी गुरुवारी (दि.20) सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे वसाहती मधील एसबीआई बँक ते कार्मेल हायस्कुल, करावली नाका, छत्रपती शिवाजी महाराज मैदाना समोरील रस्ता, भारत गॅस नाका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याचे प्रकार घडले आहेत.







