दहा दिवसानंतर आरोपी अटकेत
| जळगाव | वृत्तसंस्था |
जळगावच्या जामनेरमध्ये सहा वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून 35 वर्षीय संशयित आरोपीने बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.11) संध्याकाळी उघडकीस आली. सहा वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. तिचा शोध घेतला असता गावालगतच केळीच्या शेतात तिचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह तपासणीसाठी पाठवला होता. चौकशीमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.
मुलीचे आई-वडील मंगळवारी सकाळी मोलमजुरीसाठी बाहेर गेले असताना मुलगी घरी एकटीच असल्याचा गैरफायदा संशयित आरोपीने घेतला. संशयित हा बालिकेच्या घराजवळ राहत. त्याने मुलीला घराबाहेर बोलून तुला चॉकलेट घेऊन देतो असे आमिष दाखवले. त्यानंतर गावाच्या बाहेर केळीच्या मळ्यात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिचा निर्घृण खून करून तो फरार झाला होता.
याप्रकरणी आरोपी विरुद्ध जामनेर पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आला. फरार झालेला आरोपी जंगलामध्ये जाऊन लपला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तब्बल पाच पथके कामाला लागली होती. आठवडा उलटूनही आरोपी मिळत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पत्रकार परिषद घेऊन थेट मंत्री गिरीश महाजन यांनी राजीनामा देण्याची मागणी केली होती. तसेच आरोपीला अटक झाली नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. तब्बल दहा दिवसानंतर आरोपी हा भुसावळ शहरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. आरोपीला अटक केल्याची माहिती मिळाल्यावर या ठिकाणी समाज बांधवांनी आरोपीला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला समाज बांधवांच्या तावडीतून सोडवले आणि त्याला जळगावला नेण्यात आले.