। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय क्रिकेट संघ सध्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषकात खेळत आहे. टी-20 विश्वचषक संपल्यानंतर भारतीय संघ लगेच झिम्बाब्वे दौर्यावर जाणार आहे. मात्र, या दौर्यावर वरिष्ठ खेळाडू जाणार नसून केवळ युवा खेळाडूंनाच संधी देण्यात येणार आहे. याच कारणामुळे शुभमन गिलला झिम्बाब्वे दौर्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले जाण्याचे वृत्त आहे.
टी-20 विश्वचषकासाठी शुभमन गिलची भारतीय संघात निवड झाली नाही. गिलला राखीव खेळाडूंच्या श्रेणीत ठेवण्यात आले होते. मात्र, भारतीय संघाचा न्यूयॉर्क येथील सामने संपताच शुभमन गिलला भारतात परत पाठवण्यात आले होते. आता एका वृत्तानुसार, रोहित शर्माच्या अनुपस्थितीत झिम्बाब्वे दौर्यासाठी शुभमन गिलला भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात येणार आहे. विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या या दौर्यावर जाण्याची फारशी आशा नाही आणि अशा परिस्थितीत गिलकडे कर्णधारपदाची मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते.