| मुरुड-जंजिरा | वार्ताहर |
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी व मुरुड-जंजिरा हिंदू एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 2024-25 या शैक्षणिक वर्षा पासून इयत्ता 11वी विज्ञान शाखेचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत.
कोकणातील मुरुड-जंजिरा परिसरातील विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेच्या ज्युनिअर कॉलेजसोबतच व्यक्तिमत्त्व विकास, सैनिकी प्रशिक्षण व साहसी खेळांचे अद्ययावत प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी अर्थात भोंसलाने पुढाकार घेतला आहे. मुरुड-जंजिरा हिंदु एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने यंदाच्या वर्षापासून 11वी विज्ञान शाखेसाठी सैनिकी प्रशिक्षणसुद्धा सुरु करण्यात येणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या या दोन नावाजलेल्या संस्थांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून त्याचा रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची कौशल्ये, क्षमता, विकसित करण्यासाठी सुद्धा या अभ्यासक्रमाचा निश्चितच फार उपयोग होणार आहे. पाणी आणि जमिनीवरील आणि डोंगरातील साहसी खेळ, माउंटेनिअरींग तसेच पूर आणि आपत्तीस्थितीमध्ये देण्यात येणारे आपत्तीनिवारण प्रशिक्षण दिले जाईल व विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जाईल. या अनोख्या उपक्रमांसाठी संस्थेचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर, उपाध्यक्ष एअर मार्शल डॉ. अजित भोसले, कार्याध्यक्ष ॲड. अविनाश भिडे, सरकार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे व सहकार्यवाह माधव बर्वे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी कोकणातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक संधी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे .







