| रायगड | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील दिव्यांग रुग्णांना पुनर्वसनविषयक तज्ज्ञ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अलिबाग येथे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन, मुंबई यांच्या सहकार्याने पुनर्वसन सेवा सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाचा उद्घाटन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
या कार्यक्रमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबागच्या अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील, मुंबईचे संचालक डॉ. चंद्रशेखर टाकळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी, सहयोगी प्राध्यापक डॉ. विकास क्षीरसागर, डॉ. सुधारक बंटेवाड, डॉ. कृष्णा बडगिरे, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. फुसनाके तसेच मुंबई येथील डॉ. म्हामारे उपस्थित होते.
ही संस्था 1955 पासून शारीरिक पुनर्वसन क्षेत्रात कार्यरत असून, शारीरिक व्यंग व अपंगत्व असलेल्या व्यक्तींना पुनर्वसन सेवा उपलब्ध करून देण्याचे कार्य करते. याच संस्थेच्या सहकार्याने अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दिव्यांग रुग्णांसाठी पुनर्वसनविषयक उपचार, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या उपक्रमांतर्गत मुंबई येथील फिजिओथेरपिस्ट आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट यांची तज्ज्ञ टीम दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अलिबाग येथे भेट देणार आहे. यावेळी अस्थिरोग विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) रुग्णांची तपासणी करून त्यांच्या गरजेनुसार पुनर्वसनविषयक मार्गदर्शन व उपचार करण्यात येतील. आवश्यकतेनुसार रुग्णांना संबंधित संस्थेमार्फत पुढील पुनर्वसन उपचारांसाठीही मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या सेवेमुळे अलिबागसह रायगड जिल्ह्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना तज्ज्ञ पुनर्वसन सेवा मिळण्यास मदत होणार आहे. रुग्णांची शारीरिक कार्यक्षमता सुधारणे, दैनंदिन जीवनातील स्वावलंबन वाढविणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग आणि , मुंबई यांच्या समन्वयातून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या सहकार्यामुळे दिव्यांग रुग्णांना पुनर्वसनविषयक उपचारांसाठी अधिक सुलभ सुविधा उपलब्ध होणार आहेत. रायगड जिल्ह्यातील गरजू दिव्यांग रुग्णांनी या पुनर्वसन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अलिबाग प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.







