| मुंबई | प्रतिनिधी |
राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात सदस्यांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात असतानाच काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी एक धक्कादाय मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी पोषण आहारामध्ये चक्क सापाचं पिल्लू सापडल्याचे सभागृहात सांगितले.
विश्वजीत कदम म्हणाले की, माझ्या मतदारसंघात पोषण आहारात सापाचे पिल्लू सापडले आहे. याचे राज्याचे टेंडर इंडो अलर्ट प्रोटीन कंपनीला दिले आहे. असे सांगून विश्वजीत कदमांनी पोषण आहाराचा फोटो सभागृहात दाखवला. ही अत्यंत गंभीर गोष्ट असल्याने कंपनी व प्रशासनातील इतर दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. विश्वजीत कदम यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या मुद्द्यावरुन विधानसभा अध्यक्षांनी ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली. शासनाने याची नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत. विश्वजीत कदम यांच्या पलूस-कडेगाव या मतदारसंघामध्ये ही घटना मंगळवारी उघडकीस आली होती. गर्भवती माता व सहा महिने ते तीन वर्षांपर्यतच्या बालकांना शासनाच्यावतीने पोषण आहार दिला जातो. पलूस येथे अंगणवाडीमधून गर्भवीत माता-बालकांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले होते. त्यात डाळ, तांदूळ, तिखट, मीठ एकत्र असणाऱ्या पोषण आहाराच्या पॅकेटमध्ये मृत वाळा साप आढळून आल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. या प्रकारानंतर अंगणवाडी सेविकांना आहार वाटप न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.