| लंडन | वृत्तसंस्था |
विम्बल्डन टेनिस स्पर्धेची गतविजेती चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा वोंड्रोउसोवाला महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला. तर, अमेरिकेची जेसिका पेगुला व कोको गॉफ तसेच जपानची नाओमी ओसाका यांनी पुढच्या फेरीत आपले स्थान निश्चित केले. पुरुष एकेरीत इटलीच्या अग्रमानांकित यानिक सिन्नेर, नोव्हाक जोकोविच व अॅलेक्झांडर झ्वेरेवने दुसर्या फेरीत स्थान मिळवले.
महिला एकेरीच्या सामन्यात सहावी मानांकित वोंड्रोउसोवा सहज विजय मिळवले असे दिसत होते. मात्र, स्पेनच्या युवा जेसिका मानेइरोने वोंड्रोउसोवाला स्थिरावू न देता 6-4, 6-2 असा विजय मिळवत धक्कादायक निकालाची नोंद केली. सामन्याच्या सुरुवातीपासूनच जेसिकाने वोंड्रोउसोवाला दबावाखाली ठेवले व तिला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. 30 वर्षांपूर्वी गतविजेत्या स्टेफी ग्राफलाही अशाच पद्धतीने पहिल्या फेरीत पराभूत व्हावे लागले होते. अन्य सामन्यांत, पाचव्या मानांकित पेगुलाने अमेरिकेच्या अॅश्लेन क्रुएगरला 6-2, 6-0 असे पराभूत केले. गॉफनेही कॅरोलिन डोलेहाइवर 6-1, 6-2 असा सरळ सेटमध्ये विजय नोंदवला. तर, ओसाकाने संघर्षपूर्ण लढतीत फ्रान्सच्या डिआने पेरीला 6-1, 1-6, 6-4 असे नमवले. चौथ्या मानांकित कझाकस्तानच्या एलिना रायबाकिनाने रोमानियाच्या एलिना गॅब्रिएला रुसवर 6-3, 6-1 असा सरळ सेटमध्ये विजय नोंदवत पुढच्या फेरीत धडक मारली.
पुरुष एकेरीत सिन्नेरने जर्मनीच्या यानिक हाफमनला 6-3, 6-4, 3-6, 6-3 अशा फरकाने विजय नोंदवला. पहिले दोन सेट जिंकल्यानंतर तिसर्या सेटमध्ये हाफमनने खेळ उंचावत पुनरागमन केले. चौथ्या सेटमध्ये सिन्नेर चमक दाखवत विजय सुनिश्चित केला. तर, पुरुष एकेरीत जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असलेल्या सर्बियाच्या दुसर्या मानांकित नोव्हाक जोकोविचने चेक प्रजासत्ताकच्या विट कोपरिवाला 6-1, 6-2, 6-2 अशा सरळ सेटमध्ये नमवले. तर, चौथ्या मानांकित जर्मनीच्या अॅलेक्झांडर झ्वेरेवने स्पेनच्या रॉबर्टो कारबालेस बाएनावर 6-2, 6-4, 6-2 असा विजय मिळवला. सातव्या मानांकित पोलंडच्या हबर्ट हुरकाझने मोल्डोवाच्या राडू एल्बोटला 5-7, 6-4, 6-3, 6-4 असे नमवत पुढची फेरी गाठली. भारताच्या सुमित नागलचे विम्बल्डन स्पर्धेतील आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले. सर्बियाच्या मिओमिर केचमानोविचने नागलला 6-2, 3-6, 6-3, 6-4 असे पराभूत केले.