रायगड जिल्हा क्रिकेट असो.चा निर्णय
। रायगड । क्रीडा प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा क्रिकेट असो.कडे स्वतःच्या हक्काचे मैदान नसल्याने मुला-मुलींच्या क्रिकेट स्पर्धा व प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यासाठी खूप अडचणी येत असतात. सध्या उपलब्ध असलेल्या मैदानावर आरडीसीएतर्फे स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. परंतु, ही मैदाने एकतर खासगी किंवा कंपन्यांची आहेत, तीही काही काळासाठीच उपलब्ध होत असतात. हीच खंत दूर करण्यासाठी आरडीसीएचे उपाध्यक्ष संतोष भोईर यांच्या निवास्थानी शुक्रवारी (दि.20) विशेष कार्यकरणी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, जिल्हा क्रिकेट असो. लवकरच स्वतःच्या हक्काचे मैदान तयार करणार असल्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र क्रिकेट असो.तर्फे त्यांच्या अधिकार क्षेत्रातील सर्व 21 जिल्ह्यातील सर्व प्रतिनिधींची विशेष सभा एमसीएचे अध्यक्ष आ. रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली होती. त्यामध्ये एमसीएच्यावतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्हा क्रिकेट असो.ला सूचित करण्यात आले आहे की, आपापल्या जिल्ह्यातील विविध मैदानाचे संवर्धन व विकास करणे व नवीन मैदान निर्माण करण्यासाठीचे प्रस्ताव तयार करून तातडीने एमसीएकडे पाठवण्यात यावेत. त्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असो.कडून निधीची तरतूद करण्यात येईल. त्याचबरोबर जिल्हा क्रिकेट असो.च्या मैदानावर एमसीए आयोजित अंतरजिल्हा निवड चाचणी स्पर्धा खेळविण्यात येतील. त्यासाठी प्रत्येक सामन्यासाठी लागणारी आर्थिक तरतूदसुद्धा एमसीएकडून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या अनुषंगाने रायगड जिल्हा क्रिकेट असो.च्या विशेष कार्यकरणीच्या सभेत जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शासकीय जागांचा अहवाल प्रशासनाकडून उपलब्ध करून सादर करण्यात आला. तसेच, पेण तालुका हा मध्यावर्ती असल्याने तेथील काही जागा क्रीडांगणासाठी आरक्षित करून शासनाकडून दिर्घ मुदतीवर भाडेतत्त्वावर मिळाव्यात यासाठी अवाहाल तयार करण्यात येणार असून लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यावेळी आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक, उपाध्यक्ष संतोष भोईर, यशवंत साबळे, राजेश पाटील, खजिनदार प्रशांत ओक, सहसचिव जयंत नाईक, सदस्य संदीप पाटील, समीर मसुरकर, कौस्तुभ जोशी, अॅड. पंकज पंडित, प्रदिप खलाटे आदी उपस्थित होते.