उपांत्य फेरीतमध्ये दाखल, शफाली वर्माची धडाकेबाज खेळी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
महिला टी-20 आशिया चषक स्पर्धेतील दहाव्या सामन्यात भारतीय संघाने नेपाळविरुद्ध 82 धावांनी विजय मिळवत सेमीफायनलमध्ये धडक मारली. भारत सेमीफायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना शेफाली वर्माच्या वादळी 81 धावांच्या खेळीच्या जोरावर नेपाळला 179 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ सतत विकेट गमावत राहिला आणि निर्धारित 20 षटकात त्यांना केवळ 96 धावा करता आल्या.
या पराभवासह नेपाळ अधिकृतपणे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. महिला आशिया चषक 2024 च्या गट टप्प्यात, टीम इंडियाने तिन्ही सामने जिंकून अ गटात अव्वल स्थान पटकावले. अशा प्रकारे भारताने आशिया कपच्या उपांत्य फेरीतमध्ये सर्वात पहिल्यांदा स्थान निश्चित केले आहे. या सामन्यात भारताने दिलेल्या 179 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळ संघाने 21 धावांतच 2 महत्त्वाचे गडी गमावले. यानंतर कर्णधार इंदू बर्मा आणि सीता मगर यांनी मिळून 22 धावांची भर घातली असली तरी दोन्ही सेट झालेले फलंदाज अवघ्या 6 चेंडूंत बाद झाले. कर्णधार इंदूने 14 आणि सीताने 18 धावा केल्या. त्यामुळे नेपाळ संघ 52 धावांत 4 विकेट गमावून अडचणीत सापडला होता. इथून बळी पडण्याची अशी मालिका सुरू झाली की पुढच्या 40 धावांत संघाने उर्वरित 4 गडी गमावले. नेपाळ संघाचे 7 फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत.
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने 20 षटकांत 3 गडी गमावून 178 धावा केल्या. शफाली वर्मा आणि दयालन हेमलता यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. या दोघांमध्ये पहिल्या बळीसाठी 122 धावांची भागीदारी झाली. हेमलता 42 चेंडूत 47 धावा करून बाद झाली. त्याचवेळी शफालीने 26 चेंडूत चालू स्पर्धेतील तिचे दुसरे अर्धशतक झळकावले. यानंतर 48 चेंडूत 81 धावा करून ती बाद झाली. यादरम्यान तिने 12 चौकार आणि एक षटकार लगावला. नेपाळ विरुद्धच्या या सामन्यात स्मृती मानधनाने टीम इंडियाची धुरा सांभाळली. कारण संघाची नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरला या सामन्यात विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वास्तविक, हरमनप्रीत कौरला स्पर्धेतील वर्कलोड मॅनेज करण्यासाठी मोठ्या सामन्यांपूर्वी विश्रांती देण्यात आली. हरमनप्रीत कौर ग्रुप स्टेजच्या पहिल्या दोन सामन्यात संघाची धुरा सांभाळताना दिसली होती. तिच्याशिवाय, पूजा वस्त्राकर देखील प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हती. तिला पण विश्रांती देण्यात आली होती.