दहिवाड आदिवासीवाडीवरील ग्रामस्थांची आर्त हाक
। महाड । वार्ताहर ।
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरामध्ये मोठ्या गाजावाजा करत साजरा केला असला तरी आजही अनेक आदिवासी वाड्या त्यांच्या मूलभूत समस्यांपासून वंचित असल्याचा सक्षम पुरावा दहिवाड आदिवासीवाडीतून समोर आला आहे. दहिवाड आदिवासीवाडीला पक्का रस्ता नसल्याने त्यांचे गेली अनेक पिढ्या सुरू असलेले हाल आजही सुरूच आहेत. अनेक वर्ष रस्त्याची मागणी करून देखील सर्वच राजकीय पक्षांकडून आदिवासी बांधवांच्या पदरी निराशाच पडली आहे.
देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे उलटून गेली तरी आजही महाड तालुक्यात दुर्गम भागात वसलेल्या आदिवासीवाड्यांची दयनीय अवस्था आज देखील आहे. एकीकडे विकासाच्या नावाखाली करोडो रुपये खर्च केल्याचे दाखवले जात असताना दुसरीकडे मात्र आदिवासी आणि धनगरवस्त्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. महाड तालुक्यातील दहिवाड आदिवासीवाडीला जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने येथील आदिवासी बांधवांना पायपीट करावी लागत आहे.
महाड-बिरवाडी-वारंगी या मार्गावरून दहिवाड गावापासून जवळपास एक ते दीड किमी अंतरावर आदिवासीवाडी वसलेली आहे. सध्या या वाडीवर जाण्यासाठी कच्चा रस्ता असला तरी रस्त्यामध्ये डोंगरावरून येणारा पाण्याचा मोठा प्रवाह आहे. जोराचा पाऊस पडू लागल्यानंतर या आदिवासी बांधवांचे येणे जाणे बंद होऊन जाते. शिवाय एखादी व्यक्ती आजारी पडल्यास त्यांनादेखील झोळीमध्ये टाकून आणावे लागत आहे. ऐतिहासिक महाड तालुक्याच्या आदिवासीवाड्यांची ही बिकट अवस्था संताप जनक असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग म्हामुनकर यांनी व्यक्त केले.
दहिवाड आदिवासीवाडीवर साधारण 60 हुन अधिक घरे तर 300 पर्यंत लोकसंख्या आहे. वाडीवर अंगणवाडी आणि प्राथमिक शाळा आहे. मात्र वाडीवर जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने स्थानिक आदिवासी ग्रामस्थांचे गेली अनेक दशके सुरू असलेले हाल आजही कायम आहेत. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य, माजी आमदार स्व. माणिकराव जगताप यांनी खडीकरण रस्ता करून दिला मात्र त्यानंतर कोणीच प्रयत्न केला नसल्याने आजही हा रस्ता अर्धवट अवस्थेत पडून आहे.
या रस्त्यात पाण्याचा मोठा ओढा आहे. या ओढ्याला पावसाळ्यात पाणी येते. शिवाय ओढ्याच्या पलीकडील जागा खाजगी मालकीची असल्याने या खाजगी मालकीच्या जमिनीतून रस्ता नेण्यास हरकत घेण्यात आली होती. जेवढा रस्ता खडीकरणात झालेला आहे. तो रस्ता आधी पूर्ण केला जावा त्यानंतर आदिवासींना जाण्यासाठी पुढील रस्त्याच्या कामासाठी परवानगी देण्याचा विचार करू असे खाजगी जमीन मालकांनी सांगितले आहे. दहिवाड आदिवासीवाडीवरील ग्रामस्थ सध्या अन्य एका पायवाटेचा वापर करतात. या पायवाटेने त्यांच्या दुचाकी अर्ध्या रस्त्यातच जाऊन थांबवल्या जातात. इथून पुढे त्यांना चालत जावे लागते. दहिवाड येथून किराणा आणि रेशनिंग डोक्यावर घेऊन चालत जावे लागत आहे. एखादी महिला प्रसूतीसाठी शहरात आणावयाची झाली तर आदिवासीवाडीवरून दहिवाडपर्यंत झोळीत टाकून आणावे लागत आहे. गेली अनेक वर्ष आम्ही या रस्त्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांकडे फेर्या मारल्या मात्र आजपर्यंत हा रस्ता कोणीच करून दिला नाही अशी खंत दहिवाड आदिवासीवाडी वरील ग्रामस्थांनी व्यक्त केली. येथे असलेल्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांनादेखील दहिवाड येथून आदिवासीवाडीपर्यंत पायी चालत जावे लागत आहे. सवाने गवळवाडी आणि भांदे आदिवासीवाडीला जाण्यासाठीदेखील पक्का रस्ता नसल्याने याच दहिवाड आदिवासीवाडीवरून त्यांना पुढे जावे लागते. सवाने गवळवाडीमधील महिलांना देखील दहिवाड आदिवासीवाडीच्या रस्त्यावरूनच दहिवाड येथे पाणीटंचाईच्या काळात पाणी घेऊन जाण्यासाठी यावे लागते. भांदे आदिवासीवाडी आणि दहिवाड आदिवासीवाडी तसेच सवाने गवळवाडी येथील ग्रामस्थांनी हा रस्ता व्हावा अशी मागणी केली आहे.अनेक वर्ष आदिवासीवाडीवरील ग्रामस्थ रस्त्यांची मागणी करत आहेत.