सरबज्योत सिंगसह दुसरे कांस्यपदक पटकावले
। पॅरिस । वृत्तसंस्था ।
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक पदक मिळाले आहे. आज ऑलिम्पिक स्पर्धेचा चौथा दिवस आहे. मनू भाकेर आणि सरबज्योत सिंग यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत दक्षिण कोरियाला पराभूत करताना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे दुसरे पदक जिंकले आहे.
यापूर्वी रविवारी, मनू भाकेर महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकले होते. पॅरिसमध्ये मिळालेल्या पहिल्या यशानंतर मनु भाकरने आणखी एक ब्रॉन्ज जिंकून इतिहास रचला आहे. मनू भाकेर आणि सरबज्योत सिंग या भारतीय स्टार जोडीने दक्षिण कोरियाच्या ली ओन्हो आणि ओह ए जिन यांचा 16-10 अशा मोठ्या फरकाने पराभव केला. कोरियन जोडीने सलग मालिका जिंकून बाउन्स बॅक केले आणि सामना सुरु ठेवला मात्र, सर्व काही अपरिहार्यपणे लांबणीवर टाकले. 13व्या मालिकेत भारताने कोरियाच्या 18.5 च्या तुलनेत 19.6 गुण मिळवले आणि पदकावर आपले नाव कोरले.
मनू भाकरची यशस्वी कामगिरी
एकाच ऑलिम्पिक दोन पदकांची कमाई करणारी मनू भाकर ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपला ठसा उमटवलेला आहे. जागतिक नेमबाजीत मनू भाकरने आतापर्यंत दोन सांघिक पदके मिळवलेली आहेत. तर नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदके मिळालेली आहेत. मनू भाकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले आहे. 2022 साली मनू भाकरला एशियाडचे एक सांघिक सुवर्णपदक मिळाले होते.