। पॅरिस । वृत्तसंस्था ।
पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत टेनिसमधील दोन स्टार खेळाडू नोवाक जोकोविच आणि राफेल नदाल हे दोन खेळाडू खेळत आहेत. दरम्यान, हेच दोन कट्टर प्रतिस्पर्धी सोमवारी (दि.29) एकेरीच्या दुसर्या फेरीत आमने-सामने आले होते.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये लाल मातीच्या कोर्टवर टेनिसचे सामने खेळवले जात आहेत. या कोर्टवर नदालचा खेळ वर्षानुवर्षे बहरताना दिसला आहे. त्यामुळे त्याला लाल मातीचा बादशाह असंही म्हटलं जातं. मात्र, सोमवारी झालेल्या सामन्यात त्याच्यावर सार्बियाच्या नोवाक जोकोविचने वर्चस्व राखले. दुसर्या फेरीत जोकोविचने स्पेनच्या नदालला 6-1, 6-4 अशा दोन सरळ सेटमध्ये पराभूत केले. त्यामुळे एकेरीतून आता नदालचे आव्हान संपले आहे. परंतु, तो कार्लोस अल्काराजबरोबर स्पेनसाठी दुहेरीतही खेळत असल्याने तिथे त्याला पुढे जाण्याची अजूनही संधी आहे.
दरम्यान, सोमवारी झालेल्या सामन्यात पहिल्याच सेटमध्ये जोकोविचने नदालवर सुरुवातीलाच वर्चस्व राखले होते. त्याने आपली सर्व्हिस राखण्याबरोबरच नदालची सर्व्हिस तोडत पहिले पाचही गेम जिंकले होते. मात्र, त्यानंतर नदालने पुनरागमन करत सहावा गेम जिंकला. मात्र, जोकोविचने सातव्या गेममध्ये पहिला सेट नावावर करत आघाडी घेतली. दुसर्या सेटमध्येही जोकोविचची सुरुवात भन्नाट झाली होती. जोकोविचने पहिले चारही गेम जिंकले होते. पण यानंतर नदालने भारी पुनरागमन केले. त्याने जोकोविच्या सर्व्हिस तोडत सलग 4 गेम जिंकत सेटमध्ये 4-4 अशी बरोबरी साधली. यानंतरही नदालने जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, नंतर पुन्हा जोकोविचने नदालची सर्व्हिस तोडली आणि 5-4 अशी आघाडी घेतली. पुढचा गेमही त्याने जिंकत सामनाही जिंकला आणि तिसर्या फेरीत प्रवेश केला आहे.