। पॅरिस । वृत्तसंस्था।
पॅरिस शहरात ऑलिंपिकचा माहौल सतत जाणवत राहावा आणि सगळ्यांना सतत काही ना काही मिळावे याची खबरदारी प्रशासनाने घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून पॅरिसमध्ये ऑलिंपिकसाठी वेगवेगळ्या विषयांवर म्युझियम्स सुरू केले आहेत. ऑलिंपिक म्युझियम यापैकी एक आहे. ऑलिंपिकचा इतिहास आणि भविष्य दाखवणारे हे म्युझियम स्थानिक क्रीडाप्रेमी आणि पर्यटकांच्या आक्रषणाचे केंद्र ठरत आहे. पॅरिसच्या लक्झनबर्ग गार्डनमध्ये युरोपातील पहिले आर्ट्स म्युझियम अशी ओळख असलेल्या ‘लक्झनबर्ग म्युझियम’मध्ये हे तात्पुरते संग्रहालय तयार करण्यात आले आहे. ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक संपेपर्यंत हे संग्रहालय बघता येणार आहे.
ऑलिपिक रिंग्जचे मूळ रेखाचित्रया संग्रहालयाचे सगळ्यात मोठे आकर्षण आहे ते म्हणजे ऑलिंपिक रिंग्जचे मूळ रेखाचित्र! 1913 मध्ये आधुनिक ऑलिंपिकचा जनक पियेर द कोबेर्ता यांनी हे रोखाचित्र काढले होते आणि त्यानंतर ते ऑलिंपिकचं बोधचिन्ह म्हणून प्रचलित झाले. तिथेच ऑलिंपिक स्पर्धांमधील पहिल्या स्टेडियमचा छोटा साचाही तयार करून ठेवण्यात आला आहे.







