अद्याप 206 बेपत्ता; चौथ्या दिवशी चार जणांची जिवंत सुटका
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
केरळच्या वायनाडमध्ये 29 जुलै रोजी भूस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत मृतांचा आकडा 318 वर पोहोचला असून, अजूनही तब्बल 206 बेपत्ता आहे. बचावकार्य अजूनही सुरू असून, मोबाईल फोनच्या लास्ट लोकेशनवरून मृतांचा शोध घेतला जात असल्याची भयानक स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, बचावकार्यात शनिवारी चौथ्या दिवशी एकाच कुटुंबातील चार जणांची जिवंत सुटका करण्यात बचाव पथकाला यश आले.
वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनामध्ये तब्बल चार गावे अक्षरशः वाहून गेली. 29 जुलै रोजी पहाटे 2 ते 30 जुलै रोजी पहाटे 4 वाजेच्या दरम्यान मुंडक्काई, चुरामाला, अट्टामला आणि नूलपुझा गावात दरड कोसळली. घरे, पूल, रस्ते, वाहने वाहून गेली. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात अनेक जण वाहून गेले. आर्मी, एनडीआरएफसह स्थानिक यंत्रणांकडून वायनाडमध्ये बचावकार्य अजूनही सुरू आहे. यामध्ये मुंडक्काई, चुरलमाला, अट्टामाला आणि नुलपुझा गावांमध्ये बचावकार्य पूर्ण झाल्याची माहिती आर्मीचे अधिकारी कमांडिंग मेजर जनरल वीटी मैथ्यू यांनी सांगितले. आता या ठिकाणी बचावकार्य थांबले असून, केवळ मृतांचा शोध सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. या दुर्घटनेतील 105 मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. तर वारस नसलेल्या मृतदेहांवर प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार केले जातील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.