| चणेरा | प्रतिनिधी |
रोह्यात नुकताच कुंडलिका नदीपात्रात एकाने उडी मारून जीव दिला होता. त्याच्या मृतदेहाचा शोध तब्बल तीन दिवसांनी चोरढे येथे लागला असल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी सायंकाळी पुन्हा हिमेश नारायण ठाकूर, रा. लक्ष्मीखार-रोहा (17) याला बंधार्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याची घटना घडली. हिमेश आपल्या नऊ मित्रांसह खांबेरे हद्दीतील बोबडघर आदिवासी वाडीजवळील बंधार्यात पोहायला उतरला असता, त्याचा पाय घसरल्यामुळे तो तरुण बुडाल्याची घटना घडली. या तरुणाचा शोध होता. दुसर्या दिवशी सकाळी स्थानिक व रेस्क्यू टीम यांच्या मदतीने त्याचा मृतदेह सापडल्याचे प्रशासन सांगितले. या घटनेमुळे रोहा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात सध्या पाऊस जोरदार सुरू आहे. अनेक नद्या, नाले हे ओसंडून वाहत आहेत. अशा परिस्थितीत अनेकजण जिवाची पर्वा न करता पाण्यात आनंद घेण्यासाठी जात असतात; परंतु हा आनंद अनेकांच्या जीवावर बेतू शकतो, अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. दरम्यान, हिमेश हा तरुण आपल्या मित्रांसोबत मुंबई येथील खारदांडा येथून खांबेरे येथील बोबडघर आदिवासी वाडीजवळील बंधार्यात गेला होता. पाण्याचा अंदाज घेण्यासाठी तरुण पाण्यात उतरला असता त्याचा पाय घसरल्यामुळे तो तरुण पाण्यात बुडाला. रोहा पोलीस अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन, सह्याद्री वन जीवन रेस्क्यू टीम तसेच स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू होते. दुसर्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह सापडल्याचे नायब तहसीलदार राजेश थोरे यांनी सांगितले आहे. या घटनेनंतर पाण्याचा प्रवाह वाढलेला असल्याने तेथे कोणी पोहण्यास जाऊ नये, असे खांबेरे सरपंच अतिश मोरे यांनी आवाहन केले आहे.