। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या सहयोगी संशोधन संचालकपदी वरिष्ठ भात पैदासकार आणि भात विशेषज्ञ डॉ. बी. डी. वाघमोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. एस. बी. भगत हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने ते सांभाळीत असलेल्या प्रभारी सहयोगी संशोधन संचालक या पदाचा अतिरिक्त पदभार डॉ. बी. डी. वाघमोडे यांच्याकडे सोपविण्याचे आदेश डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या मान्यतेने कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर यांनी निर्गमित केले.
डॉ. बी. डी. वाघमोडे हे मागील जवळपास साडे सत्तावीस वर्षांपासून संशोधन, बीजोत्पादन, विस्तार कार्य करीत आहेत. त्यांनी विविध पिकांचे 27 वाण विकसित केले आहेत. संशोधन कार्यातील बहुमूल्य कामगिरीमुळे त्यांना आतापर्यंत 21 प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. भात विशेषज्ञ म्हणून कर्जत येथे रुजू झाल्यापासून त्यांनी त्यांच्या विभागात बर्याच सुधारणा घडवून आणल्या तसेच नवे प्रकल्पही सुरू केले आहेत.ते या संशोधन केंद्राचा कायापालट करतील, असा विश्वास व्यक्त केला जात असून डॉ. एस. बी. भगत, डॉ. रवींद्र मर्दाने, डॉ. नामदेव म्हसकर, डॉ. महेंद्र गवई, डॉ. विजय दामोधर, डॉ. विजय सागवेकर, डॉ. तुषार बेडसे तसेच नामांकित शास्त्रज्ञांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.







