| पनवेल | प्रतिनिधी |
श्री ब्रह्मचैतन्य मासिक संगीत सभेचे 33 वे पुष्प संपन्न झाले. पनवेल येथील गोंदवलेकर महाराज नामस्मरण केंद्रामधे संपन्न झालेल्या या संगीत सभेमधे चैत्राली देसाई आणि तन्वी जोशी या युवा गायिकानी संगीत सेवा सादर केली.
चैत्राली हिने संगीत सभेची सुरुवात पुरीयाधनश्री या रागाने केली. यामधे तिने मबल बल जाऊफ हा विलंबित ख्याल आणि पायलिया झनकार ही द्रुत बंदिश सादर केली आणि त्याला जोडून पुरीयाधनाश्री मधील तरंग हा गायन प्रकार सादर केला. तन्वी जोशी हिने निःशंक हो, निर्भय हो मना हा स्वामीसमर्थांचा तारकमंत्र सादर केला. यानंतर चैत्राली व तन्वी यांनी रूप पाहता लोचनी, गुरुविण कोण मज दाता, रुणुझुणू रे भ्रमरा, अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करील श्रीराम, वद जाऊ कुणाला शरण, मुरलीधर श्याम, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, जय जगत जननी माता ही विविध प्रकारची भक्तिगीते सादर केली. बाजे मुरलीया बाजे या भैरवीने त्यानी संगीत सभेची सांगता केली.
अथर्व देव याने गायिकाना संवादिनी साथ केली तसेच संवादिनीवर मुरलीया बाजे हे गीत सादर केले. आदित्य उपाध्ये यांने तबला आणि चैतन्य कोशे यानी तालवाद्य साथ केली. समीर सोमण यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. ही सभा यशस्वी करण्यासाठी मठातील सर्व कार्यकर्ते व आयोजकांनी मोलाचे योगदान दिले.






