। बदलापूर । प्रतिनिधी ।
बदलापुरातील नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर काल बदलापुरात मोठे आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला अटक केली होती. आता आरोपी अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अक्षय शिंदे याने बदलापूरच्या एका नामांकित शाळेतील दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले होते. यानंतर बदलापूरमध्ये संतापाची लाट उसळून त्याची परिणती उग्र आंदोलनात झाली होती. या पार्श्वभूमीवर प्रचंड मोठा फौजफाटा तैनात करुन बुधवारी (दि. 21) सकाळी आरोपी अक्षय शिंदे याला कल्याण कोर्टात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर सरकारी वकिलांनी हे प्रकरण गंभीर असून, याप्रकरणाची अधिक चौकशी करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यानुसार न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदे याला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.