| रोहा | प्रतिनिधी |
पतीला पळवून नेल्याची धक्कादायक घटना रोहे तालुक्यातील कोलाड भागात घडली आहे. या विषयी पीडित पतीच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, रोहे तालुका समवेत संपूर्ण रायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुली, तरुणी आणि विवाहित महिला बेपत्ता झाल्याचे घटना घडल्याची नोंद बहुतांश पोलीस ठाण्यांत करण्यात आली आहे. परंतु, चक्क पतीला पळवून नेल्याची घटना प्रथमच समोर येत असल्याने पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश दत्तात्रय वालेकर (32) असे पीडित पतीचे नाव आहे. ते दि.20 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घरा बाहेर गेले असताना त्यांना कोणीतरी पळवून नेल्याची तक्रार पत्नीने कोलाड पोलीस ठाण्यात केली आहे. अधिकारी भरत फारणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस.बी. मेरगळ अधिक तपास करीत आहेत.






