| अलिबाग | प्रतिनिधी |
पी.एन.पी. होली चाईल्ड इंग्लिश मीडियम स्कूल, वेश्वी अलिबाग येथे फादर्स डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग घेत फादर्स डे चा आनंद लुटला.
शाळेच्या प्रांगणात आयोजित या विशेष कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले, उपमुख्याध्यापिका शर्मिला शेट्टे, राजश्री पाटील, समिता मालोदे, शारदा परदेशी, सायमा उल्डे, उदय पाटील यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या वडिलांसाठी खास गाणी, नृत्य आणि भाषणे सादर केली. काही विद्यार्थ्यांनी वडिलांसाठी स्वतः बनवलेली शुभेच्छा पत्रे देऊन त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला. यावेळी शाळेच्या वतीने वडिलांसाठी विविध मजेदार खेळ आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व खेळांमध्ये वडिलांनी लहान मुलांसारखा आनंद घेत सहभाग घेतला, त्यामुळे संपूर्ण वातावरण हसऱ्या-खेळकर झाले होते. या स्पर्धाचे परीक्षण केतन पाटील आणि वृषाली घरत यांनी केले. वडील आणि मुलामधील नाते अधिक घट्ट व्हावे, वडिलांच्या त्यागाची जाणीव मुलांना व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे मुख्याध्यापीका निसर्गा चेवले यांनी सांगितले. आजच्या धावपळीच्या जीवनात वडिलांना मुलांसोबत वेळ घालवता येत नाही, अशा कार्यक्रमांमुळे आम्हाला मुलांसोबत एक दिवस मजा करता आली, अशी प्रतिक्रिया प्रणय पाटील या पालकाने व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व वडिलांचे आभार मानून त्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.







