| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |
महाराष्ट्रात संभाव्य तीव्र पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रभागांमध्ये विहिरी, बोअरवेल आणि अन्य भूजल स्रोतांचे सर्वेक्षण करावे. तसेच पाण्याची गुणवत्ता तपासून भूजल पुनर्भरण, आवश्यकतेनुसार नवीन सार्वजनिक बोअरवेल आणि आपत्कालीन पर्यायी पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, अशी मागणी नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त आणि महापौर यांना निवेदन दिले आहे.
पनवेल परिसरात वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे नागरीकरण आणि निवासी व औद्योगिक क्षेत्रांचा विस्तार यामुळे पाण्याची गरज वाढत आहे. उन्हाळ्यात धरणातील पाणीसाठा कमी होणे, मुख्य जलवाहिनीत बिघाड होणे किंवा अन्य कारणांमुळे पाणीपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दीर्घकालीन आणि शास्त्रीय नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे शर्मा यांनी निवेदनात नमूद केले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सार्वजनिक व खासगी विहिरी, बोअरवेल आणि अन्य जलस्रोतांची नोंदणी करून त्यांची पाणी उपलब्धता, भूजलपातळी आणि सद्यस्थिती तपासावी. पाणीटंचाईग्रस्त भाग निश्चित करून तांत्रिक सर्वेक्षणानंतरच नवीन सार्वजनिक बोअरवेल उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, सार्वजनिक जलस्रोतांच्या पाण्याची मान्यताप्राप्त प्रयोगशाळेमार्फत तपासणी करून पाणी पिण्यास योग्य असल्याची खात्री करावी. पावसाचे पाणी संकलन, भूजल पुनर्भरण आणि अस्तित्वातील विहिरींचे पुनरुज्जीवन यावरही भर देण्यात आला आहे.






