| पनवेल | प्रतिनिधी |
सुकापूर येथील पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या मरीआई हॉटेलच्या किचनमध्ये आग लागल्याची घटना घडली. माहिती मिळताच पनवेल महानगरपालिकेच्या नवीन पनवेल अग्निशमन केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. हॉटेलच्या किचनमध्ये आग लागल्याची आणि एक्झॉस्ट लाईन टेरेसपर्यंत पोहोचल्याची माहिती नवीन पनवेल अग्निशमन केंद्राला दूरध्वनीद्वारे देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन वाहनासह जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरुवातीला एबीसी अग्निशामक यंत्राचा वापर करण्यात आला. त्यानंतर होज रीलच्या साहाय्याने टेरेसपर्यंत पाण्याची लाईन नेऊन एक्झॉस्ट लाईनचे कुलिंग करण्यात आले. जवानांच्या प्रयत्नांमुळे आग पूर्णपणे आटोक्यात आली. या घटनेत जीवितहानी किंवा नुकसानीबाबतची माहिती उपलब्ध झालेली नाही.





