| अलिबाग | प्रतिनिधी |
दिवाळीच्या सणानिमित्त खरेदी, चविष्ट खाद्यपदार्थ आणि मनोरंजनाची मेजवानी अनुभवण्याची संधी अलिबागकरांना मिळणार आहे. अलिबाग नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे 30 ऑक्टोबरपासून ‘दिवाळी महोत्सव 2026’चे आयोजन करण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या पटांगणात हा महोत्सव रंगणार असून, विविध वस्तूंच्या खरेदीसह खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शुक्रवार, (दि.30) सायंकाळी 5 वाजता या महोत्सवाचे उद्घाटन अर्बन बँकेच्या अध्यक्ष सुप्रिया पाटील यांच्या हस्ते होणार आहे. अलिबाग नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक या कार्यक्रमाच्या पदसिद्ध सदस्य म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवात 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत स्टॉल नागरिकांसाठी खुले राहणार आहेत. खाद्यपदार्थ, दिवाळीचे साहित्य, कपडे, दागिने, अलंकार, घरगुती उत्पादने आणि इतर विविध वस्तूंचे स्टॉल येथे उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी एकाच ठिकाणी विविध पर्याय नागरिकांना मिळणार आहेत. या कार्यक्रमाला अलिबाग नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी संतोष म्हात्रे, महिला व बालकल्याण विभागाच्या उपसभापती ॲड. अश्विनी ऋषिकेश ठोसर, डॉ. साक्षी गौतम पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर संभाजी साळुंखे यांच्यासह सर्व सभापती, नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित राहणार आहेत. अलिबाग नगरपरिषदेच्या पटांगणात आयोजित या दिवाळी महोत्सवाला नागरिकांनी भेट देऊन खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन महिला व बालकल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.







