प्रदूषणाचा मुद्दा निघणार निकाली
पुढच्या वर्षी एप्रिलपासून शुभारंभ
पेण | संतोष पाटील |
वाढत्या इंधनाच्या किमतीचा विचार करता तसेच होणारा प्रदूषण, इंधनाचा तुटवडा याचा सारासार विचार करून महाराष्ट्र परिवहन खात्याने एसटी बसेस इलेक्ट्रिकवर चालवण्याचा मानस ठेवला आहे. रायगड विभागामध्ये प्रायोजिक तत्त्वावर एकूण 57 बसेस धावणार असून, या बसेस तालुका-तालुका, जिल्हा-तालुका अशा मध्यम, लांब पल्ल्याच्या भागात धावणार आहेत.
ही इलेक्टॉनिक बस एकदा चार्जिंग केल्यानंतर कमीत कमी तीनशे किलोमीटर, तर जास्तीत जास्त चारशे किलोमीटर दूर धावणार आहे. या चार्जिंगसाठी तीन तासांचा अवधी लागणार आहे. राज्यामध्ये एकूण 2 हजार बसेस धावणार आहेत. यामधील 57 बसेस ह्या रायगड विभागासाठी आहेत. महाड, माणगाव, श्रीवर्धन, रोहा, मुरूड, अलिबाग, पेण, कर्जत या आठ ठिकाणांहून बसेस धावणार आहेत. याची सुरूवात एप्रिल 2022 ला होणार आहे.
रायगड विभाग प्रायोगिक तत्त्वावर 57 बसेस आठ आगारातून चालवणार आहे. या बस नॉन एसी असतील. या गाड्यांमध्ये वाहक नसतील. आसन व्यवस्था ही टू बाय टू असेल. तसेच साधारणतः लाल पांढर्या रंगाची बस असणार आहे. एप्रिल 2022 ला या बसेस रायगडमधून धावल्या जातील. ग्रामीण भागात या बसेस वापरल्या जाणार नाहीत. तसेच आतापर्यंत चार्जिंग पॉईंट कोठे ठेवायचे, हे ठरलेले नाही. त्यावर अभ्यास सत्र सुरू आहे.
अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, रायगड
डिझेलप्रश्न सुटणार
या इलेक्ट्रिक बसेसमुळे सर्वात मोठा डिझेलप्रश्न सुटणार आहे. कर्मचार्यांच्या पगारानंतर महामंडळाला खर्चीक जो भाग आहे, तो म्हणजे इंधनाचा. रायगड विभागासाठी दिवसाला 24 हजार लीटर डिझेल लागतो. साधारणतः याच्या खर्चाचा विचार करता तो 25 लाखांच्या वर असतो. प्रायोजिक तत्त्वावर रायगड विभागतील 479 बसेस पैकी 57 बसेस हया इलेक्ट्रिक बसेस असतील. त्या मुंबई, पनवेल, बोरीवली या भागात धावतील. साधारणतः 150 ते 250 किलोमीटर मध्यम पल्ल्याच्या, तर 250 ते 300 किलोमीटर लांब पल्ल्याच्या भागात या बसेस धावल्या जातील.