निष्काळजी बेजबाबदारपणाचा ठपका ठेवून गुन्हा दाखल
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
काही दिवसांपूर्वी दिवेआगर येथील समुद्रात बुडून आठ विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी निष्काळजी आणि बेजबाबदार पणाचा ठेपका ठेवून विनर्स ॲकेडमीच्या संस्थापक शिक्षकांसह पाच जणांविरोधात दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील आळंदीमधील विद्यार्थ्यांची रायगड जिल्ह्यातील सहल शिक्षकांना भोवली असल्याचे दिसून येत आहे.
पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील विनर्स ॲकेडमीच्या अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची सहल दि.1 ऑक्टोबर रोजी रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे आली होती. दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी दिघी सागरी पोलीस ठाण्यात सुरुवातीला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात विनर्स ॲकेडमधील विद्यार्थ्यांसह शिक्षक व इतर मंडळी असे 48 जणांची शैक्षणिक सहल रायगड किल्ला पहाण्यासाठी काढण्यात आली होती. रोप वे मार्फत किल्ल्यावर जाण्यासाठी माणसी तिकीटाचे पैसे विद्यार्थ्यांकडून घेण्यात आले होते. मात्र, रोप वे बंद असल्याने या विद्यार्थ्यांना पायरी मार्गे गडावर नेण्यात आले. त्यानंतर श्रीवर्धन समुद्रकिनारी जाण्याचे नियोजन होते. परंतु, शिक्षक व इतर मंडळींनी दिवेआगर समुद्रकिनारी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिवेआगर येथील समुद्रकिनारी सायंकाळी सर्वजण पोहचले. विद्यार्थ्यांना पोहता येत नसल्याचे माहित असतानाही सुरक्षिततेची साधने शिक्षकांकडून पुरविण्यात आली नाही. त्यामुळे या समुद्रात आठ विद्यार्थ्यांचा सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास समुद्रातील पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे कोणतीही सुरक्षिततेची साधने न पुरवता निष्काळजी आणि बेजबाबदारपणे विद्यार्थ्यांना समुद्राच्या पाण्यात खेळण्यात पाठविले, असा ठपका ॲकेडमीच्या संस्थापक शिक्षक अमर आडक यांच्यासह पाच जणांवर ठेवण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मृत विद्यार्थ्यांच्या पालकांकडून दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.







