हवामान विभागाकडून यलो अलर्ट
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यासह पाच जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये गुरुवारी (दि.22) वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला असून, हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाचे चटके जाणवत आहेत. उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शेत जमीनीला भेगा पडू लागल्या आहेत. हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भिती निर्माण झाली आहे. रब्बी हंगामावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच, दुपारच्यावेळी घरातून बाहेर पडणे कठीण होऊ लागले आहे. कडक उन्हामुळे आरोग्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. शरीरात गारवा निर्माण करण्यासाठी अनेकजण थंड पेय पिण्यावर अधिक भर देत आहेत. काहीजण नारळ पाणी, कोकम सरबत, लिंबू सरबत, पायनापल ज्यूस पिण्यावर भर देत आहेत. तसेच, उन्हापासून बचाव करण्यासाठी गॉगल, स्कार्पचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. पावसाने सप्टेंबरपासून दडी मारल्याने हवेत उष्णताही प्रचंड वाढली आहे. मात्र, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात प्रचंड हवामान बदल झाला आहे. या हवामान बदलांमुळे रायगडसह कोकणात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे रायगडसह पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. गुरुवारी (दि.22) जिल्ह्यातील अनेक भागांत मध्यम व हलक्या स्वरुपात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गुरुवारी पाऊस पडल्याने हवेत गारवा निर्माण होऊन पावसाअभावी कमी होत चाललेली पाण्याची पातळी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याची समस्या भेडसावण्याचा सुटणार असल्याचे बोलले जात आहे.






