। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यासह संपुर्ण रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि.27) दहीहंडीची धूम पाहायला मिळाली. यावेळी अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने गोपाळकाला साजरा करण्यात आला. गोकुळाष्टमी हा पारंपरिक महत्वाचा व उत्साहाचा सण आहे. सर्व अबाल वृद्धांसह तरुणाईला गोकुळाष्टमीची ओढ लागलेली असते. सुधागड तालुक्यात पाली, जांभूळपाडा, परळी, पेडली आदी सर्वच ठिकाणी दहीहंडीची धूम पाहायला मिळाली. पारंपरिक पद्धतीने तसेच पारंपारिक पेहराव व पारंपरिक वाद्यांच्या चालीवर गोपाळकाला उत्सव साजरा करण्यात आला.
आदिवासी वाड्या पाड्यावर देखील गोपाळकाल्याचा उत्साह पाहायला मिळाला. छोट्या मोठ्या दहीहंडी फोडण्याचा थरार देखील अविस्मरणीय होता. नृत्याचा ठेका धरत, गाणी म्हणत हे गोपाळ घरोघरी जात होते. तेथे दहिकाला, फळे आदी प्रसाद व अंगावर पाणी ओतून त्यांचे स्वागत झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्साहात मनोरे रचून निपुण हंडी फोडली. यावेळी मुलींनीही मुलांसोबत मिळून धाडस दाखवत मनोरे रचले. मुलांच्या हाती विविध शैक्षणिक साहित्य मिळाले त्यात अक्षर, अंक, शब्द, रंग, चित्र मुलांनी वाचून ओळखुन दाखवले. तिसरी पर्यंतच्या मुलांना ही संधी मिळाली. या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये साक्षरता, संख्याज्ञान व निपुणतेची जाणीव निर्माण झाली. यावेळी या अनोख्या कार्यक्रमाबद्दल पालकांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांची ‘निपुण’ हंडी
जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर सुधागड तालुक्यातील रा.जि.प नेणवली शाळेत निपुण शिक्षण हंडी फोडण्यात आली. हंडी फोडल्यानंतर त्यातून निघालेले निपुण भाषा, गणित व शिक्षण साहित्य विद्यार्थ्यांनी आनंदाने वेचले. या कार्यक्रमातून मौजमजेबरोबर विद्यार्थ्यांना निपुण भारत अभियानाचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले. या निपुण हंडीत पाणी बचतीचा संदेश देखील मिळाला.
उत्सव अलिबाग तालुक्यातील आक्षी स्तंभाजवळ शेतकरी कामगार पक्ष आक्षी आयोजित दहिहंडी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील (चिऊताई) यांनी साई सेवक गोविंदा पथक मंडळाला भेट दिली. तसेच, माजी जि.प. सदस्य द्वारकानथ नाईक, सरपंच रश्मी पाटील, उपसरपंच आनंद बुरांडेसह ग्रामपंचायत सदस्य, शेकाप कार्यकर्ते, ग्रामस्थ व विविध गोविंदा पथके उपस्थित होते.
कृष्ण गवळणींचा गोफ रास क्रीडा
नांदगाव येथील खारीकवाडा गावकीच्या दहीहंडी आधी गावातील मंडळी कृष्णाचे रूप साकारून गावात गोफ व रास क्रीडा सादर करतात. हि आगळीवेगळी प्रथा फक्त याच गावात होते. ही रासक्रीडा पाहण्यासाठी हजारो परिक्षक येतात. ही मंडळी गोफ रचना सोडवतात. या गोपामध्ये 1) गोप, 2) तोरा, 3)सिंगल कारला, 4) डबल कारला, 5) पट, 6) दाबली, 7) साखळी असे एकूण सात डाव असतात. कृष्ण गवळणींचा गोफ ही रास क्रीडा परंपरा खारीकवाडा ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून गेली शंभर वर्षापेक्षा जास्त अविरतपणे सुरू आहे.
रायवाडीतील तरूणांचा उत्साह शिगेला
अलिबाग तालुक्यातील रायवाडी गावातील तरुणांसह बाळगोपाळ व ग्रामस्थांनी मंगळवारी (दि.27) दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. गावातील तरुण मंडळींनी वर्षानुवर्षे चालत आलेली दारोदारी जाऊन पाणी मागण्याची प्रथा अखंड जोपासली आहे.
दहीहंडी निमित्त गावातील पहिल्या घरापासून ते शेवटच्या घरात जाऊन पाणी मागण्यात आले. तो श्रीकृष्णाचा प्रसाद समजून लहानग्यांनपासून तरूणांनी या पाण्यात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. तसेच, प्रत्येक घरात दही, पोहे, साखर यांचा काला करून तो प्रसाद म्हणून वाटण्यात आला. यादरम्यान दारोदारी पाणी मागण्यासाठी जात असताना मार्गातील प्रत्येक हंडी फोडण्यात आली. यावेळी एकूण सहा हंड्या व एक हंडी डोळे बांधून काठीच्या सहाय्यान अशा एकूण 7 हंड्या फोडण्यात आल्या.
गोपाळकाला उत्साहात साजरा
पेण तालुक्यातील गडब गावात जांभेळा, चिर्बि, घाट, मांचेळा, मौजे हे पाच पाडे असुन प्रत्येक पाड्यात गोपाळकाला पांरपारिक पध्दतीने साजरा करण्यात आला.
परंपरेप्रमाणे गोविंदा पथक येथिल हनुमान मंदीराजवळ आल्यावर त्या ठिकाणी ढोलाच्या तालावर पारंपारिक नृत्य करत गाणी गाण्यात आली. तसेच, विविध ठिकाणी दहीहंडी फोडण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने महलांनी व नागरीकांनी गर्दी केली होती.
श्रीकृष्ण जन्माष्टमीला अलिबाग जवळील गवळीवाडी येथील राधाकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पाळणा गात महिलांनी जन्मोत्सव साजरा केला. अलिबाग तालुक्यातील गावदेवी गोविंदा पथकाने 5 थर लावून, गवळीवाडी येथील श्रीकृष्ण महिला गोविंदा पथकाने थरावर थर रचून तर चेंढरे येथील आंग्रेकालीन कानिफनाथ मठात एकत्रीत बांधलेल्या मानाच्या दहिहंडी सोरट मारून फोडण्यात आल्या असून बालगोपाळांनी दहीहंडी उत्सव साजरा केला.
म्हसळ्यात गोविंदा उत्सव साजरा
म्हसळा शहरात एकूण तीन गोविंदा पथके गोविंदा खेळतात. यामध्ये श्रीराम पेठकर (बाझारपेठ गोविंदा), कुंभार समाज गोविंदा आणि सोनार-कासार समाज गोविंदा असे पथक आहेत.
श्रीराम पेठकर समाज आणि कुंभार समाज गोविंदा पथके संपूर्ण शहरभर दहीहंडी खेळते. तसेच, शहरात सार्वजनिक आणि घरगुती अश्या एकूण जवळपास 150 दहीहंड्या फोडल्या गेल्या. यावेळी कुठेही अनुचित प्रकार घडला नसून यासाठी पोलीस खात्याकडून योग्य तो चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अलिबाग तालुक्यातील श्रीगाव येथे तीन थरांची दहीहंडी फोडताना बाळगोपाळ
पनवेल च्या कोळी वाडा येथे ही गोकुळाष्टमी सण मोठया उत्सव साजरा होतो पहिली देवळतील हंडी फोडल्यावर कोळी वाडा मध्ये अनेक नागरिक मानाच्या नवसाच्या हंडया लावत असतात त्या हंडया कोळी वाडा मधील मुले फोडतात श्री कुष्ण ची पालखी निघते
गोकुळाष्टमी निमित्त पनवेल च्या लाईन आळी मधील तीनशे वर्षा पूर्वी पासून चालेली परंपरा देवाची हंडी पाहण्याकरता अनेक नागरिक येत असतात सकाळी साडे दहा ला हा उत्सव सुरु होतो वेगळा क्षण असतो अनेक जण नवस बोलतात त्याच हंड्या लागलेल्या असतात पनवेल मध्ये अस्थना बसलेले आहेत मोठया उत्सहात सण साजरा होतो
इंग्लिश मिडीयमस्कूलचा श्रीकृष्ण जन्म
कर्जत मधील के.ई.एस.इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये संस्थेचे 50 वे वर्ष साजरे होत असताना. प्रायमरी बालगोपाल विद्यार्थ्यांनी श्री कृष्ण जन्म व दहीहंडी उत्सव साजरा केला.याप्रसंगी मुख्याध्यापिका अनुपमा चौधरी, स्नेहा गोगटे, संपदा भोगले, ज्योती देवघरे आदी उपस्थित होते. विद्यार्थी जणू गोकुळातच सण साजरा करत आहेत असे वातावरण होते.