जॉडी ग्रिनहॅमची कामगिरी प्रेरणादायी
। पॅरिस । वृत्तसंस्था ।
पॅरा ऑलिम्पिक 2024 स्पर्धेच्या तिसर्या दिवशी गर्भवती पॅरा-तिरंदाज जॉडी ग्रिनहॅमने महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंडमध्ये पॅरालिंपिक्स जीबी संघ सहकारी आणि गतविजेत्या फोबी पॅटरसन पेनला हरवून कांस्यपदक जिंकले. ग्रिनहॅम सात महिन्यांची गर्भवती असून देखील तीने कांस्यपदकावर नाव कोरले आहे. तीने केलेली उत्तुंग कामगिरी ही इतर अनेक मातांना प्रेरणादायी ठरणार आहे.
जॉडी ग्रिनहॅमचा जन्म झाला तेव्हा तिच्या डाव्या हाताला बोटं नव्हती. फक्त अर्धा अंगठा होता. तिला दोन वर्षांचा मुलगा आहे. याआधी ती तीनदा गरोदर राहूनही ती आई होऊ शकली नव्हती. अशा परिस्थितीत गर्भधारणेदरम्यान तिरंदाजी करणे केवळ शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही कठीण असते. सेमीफायनल सामन्यादरम्यान ग्रिनहॅमला खूप त्रास झाला. या सामन्यादरम्यान तिचे मूल पोटात हालचाल करत होते आणि ती हरली. त्यामुळे तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकण्यापूर्वी तिने शनिवार व रविवार पॅरिसमधील रुग्णालयात घालवला होता. कारण तिचे बाळ हालचाल करत नव्हते. तिच्या मुलाच्या हृदयावर सतत लक्ष ठेवण्यात येत होते. प्रशिक्षणादरम्यान, ती मुलाच्या अनपेक्षित हालचालींची तयारीही करत होती. ती आता तिच्या मुलाला सांगू शकणार आहे की, जगात येण्यापूर्वीच तो पोडियमवर पोहोचला होता. ग्रिनहॅमने तिच्याच देशाची ऍथलीट फोबी पॅटरसन पाइन हिला पराभूत करून कांस्यपदकाची कमाई केली.
दोघीही एकमेकांच्या चांगल्या मैत्रिनी आहेत. 31 वर्षीय जॉडीने कांस्यपदक जिकून इतिहास घडवला. गर्भवती महिलांना संदेश देताना ती म्हणाली, आयुष्यात तुम्हाला जे करायचं ते करा, जर तुम्ही आनंदी, निरोगी असाल आणि बाळ निरोगी, सुरक्षित असेल, तर तुम्ही तुमचे कोणतेही काम करत राहू शकता. यामध्ये कोणतीही अडचण येत नसल्याचे ती म्हणाली.