। ठाणे । प्रतिनिधी ।
ठाण्यात चोरीच्या संशयातून चार सुरक्षा रक्षकांनी एकाची हत्या केली आहे. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
मानपाडा येथील भवानी नगर परिसरातील इमारतीच्या 23 व्या मजल्यावरील सदनिकेत रविवारी एकजण जखमी अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाली होती. माहितीनुसार चितळसर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या व्यक्तीला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रथमेश चव्हाण (26) असे मृताचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता राजेश यादव (30), प्रमोद कुमार यादव (25), गंगाराम यादव (41) आणि प्रकाश मोहीते (50) या चौघा सुरक्षा रक्षकांनी त्यांना चोरीच्या संशयातून बेदम मारहाण केल्याचे उघडकीस आले. पोलिसांची तपासात दिशाभूल करण्यासाठी प्रकाश याने स्वत: पोलिसांना संपर्क साधून व्यक्ती जखमी असल्याची माहिती दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.