पूजन साहित्य खरेदीसाठी महिलांची बाजारपेठेत गर्दी
। रायगड । प्रतिनिधी ।
श्रावण महिना संपताच वेध लागतात ते गणपती बाप्पाच्या आगमनाचे. यंदा सर्वांचा लाडका बाप्पा शनिवारी (दि. 7) घरोघरी विराजमान होणार आहेत. तत्पूर्वी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी शुक्रवारी (दि. 6) हरितालिका देवीचे पूजन केले जाणार आहे. त्यामुळे पूजेच्या साहित्य खरेदीसाठी लगबग सुरू आहे.
हरितालिकेची मूर्ती, पत्री आणि सजावटीचे साहित्य घेण्यासाठी बाजारपेठेत महिलांची गर्दी होत आहे. विविध प्रकारची फळे, फुले, दुर्वा आणि हरितालिका देवीच्या मूर्ती, सजावटीसाठी लागणारे दागिने, शोभेच्या वस्तू घेण्यात ग्राहक मग्न आहेत, तर विक्रेत्यांनी बाजारपेठेत हरितालिकेच्या आकर्षक मूर्ती आणल्या आहेत. हरितालिका देवीच्या पूजेवेळी वाळूपासून शंकराची पिंड बनवतात, मात्र हल्ली वाळू पटकन उपलब्ध होत नसल्याने विक्रेत्यांनी वाळूची पाकिटेही विकायला सुरुवात केली आहे.
हरितालिकेची मूर्ती, पत्री, वाळू आणि पूजासाहित्य असे एकत्र पॅकेजही दुकानदारांनी 200 ते 250 रुपयांत उपलब्ध केले आहे, तर दोन देवी व शंकराची पिंड अशा वेगवेगळ्या मूर्तींची किंमत प्रति 50 ते 200 रुपये आहे, तर मूर्तींच्या दर्जा व आकार यानुसार त्याची किंमत वेगवेगळी आहे, तसेच ऑनलाइन विक्री करणार्या उद्योजकांनीही हरितालिका पूजासाहित्य विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. हे साहित्य घरपोच देण्याचीदेखील व्यवस्था केली आहे. हरितालिका व्रताचे अनन्यसाधारण महत्त्व गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी येणार्या हरितालिका व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते. भगवान शंकर आपल्याला पती रूपाने मिळावा, यासाठी पार्वती देवीने हे व्रत केले होते. तेव्हापासून हे व्रत कुमारिकेपासून लग्न झालेल्या महिला करतात. विशेष म्हणजे हे व्रत दरवर्षी न चुकता केले जाते.
पूजेसाठीचे साहित्य
हरितालिकेच्या पूजेसाठी रेती, बेल पत्र, शमी पत्र, आंब्याची पाने, पांढरी फुले, वस्त्र, तसेच 16 प्रकारच्या झाडांची प्रति 16-16 पाने अर्थात पत्री, पूजेसाठी फुले, सौभाग्याचे साहित्य त्यात बांगड्या, काजळ, कुंकू, श्रीफळ, कलश, चंदन, तूप, तेल, कापूर, साखर, दूध, मध, दही यांचा समावेश असतो.