लोकचळवळ व्हावी; शेखर भडसावळे यांचे आवाहन
। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ परिसरातील डोंगरांवर लागणारे वणवे रोखण्यासाठी सहा वर्षांपूर्वी कृषिभूषण शेतकरी शेखर भडसावळे यांनी चळवळ सुरु केली. त्यानंतर त्यांनी सगुणा रुरल फाऊंडेशनचे माध्यमातून सगुणा वनसंवर्धन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काम सुरु केले आहे. मात्र डोंगरावर, टेकड्यांवर लागणारे वणवे हे मानवनिर्मित असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, हे सर्व वणवे रोखण्यासाठी सगुणा वनसंवर्धन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकचळवळ व्हावी, असे आवाहन कृषिरत्न शेतकरी शेखर भडसावळे यांच्याकडून करण्यात आले आहे.
2018 पासून सगुणा रूरल फाऊंडेशन नेरळ-माथेरान जंगल क्षेत्रातील टेकडी येथील पर्यावरणीय संतुलन पुनर्स्थापित करण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहे. सगुणा वनसंवर्धन तंत्रज्ञान या नाविन्यपूर्ण पद्धतीद्वारे, आम्ही जंगलातील वन वणवे आणि दुर्गम टेकड्या व डोंगरांचा हरितकरण करणे यांसारख्या महत्त्वाच्या पर्यावरणीय समस्यांवर उपाय शोधत आहोत. अनेक वर्षांच्या प्रयत्नांमुळे आम्हाला उल्लेखनीय परिणाम मिळाले असून माती, पाणी आणि जैवविविधता जतन करण्यासाठी टिकाऊ आणि प्रभावी पद्धती विकसित केल्या आहेत. कोकण सारख्या जास्त पावसाच्या भागात पारंपरिक पद्धतीने सलग समतल चर याला प्रोत्साहन दिले जाते. मात्र, आमच्या कामामधून या पद्धतीचे मोठे तोटे उघडकीस आले आहेत.
वाळा गवताच्या खोल मुळांच्या प्रणालीमुळे मातीला मजबूती मिळते, मातीची धूप लक्षणीयरीत्या कमी होते आणि भूजलाचे पुनर्भरण होतो. ही पद्धत केवळ अधिक प्रभावीच नाही, तर नैसर्गिक परिसंस्थादेखील पुनर्स्थापित करते. वास्तवः गवत जाळल्यामुळे सेंद्रिय कार्बन आणि जैवविविधता नष्ट होते, जी मातीचे कण बांधून ठेवण्यासाठी आवश्यक असते आणि त्यामुळे मातीचे गटिकरण कमी होते.
शिवाय, यामुळे जमीन ओसाड होते आणि जमिनीचे अधःपतन वेगाने होते. त्यात जाळपट्टे आखून जंगलातील वन वणवे टाळण्यासाठी पारंपरिक पद्धतीने तयार केलेले जाळ पट्टे अनेकदा अप्रभावी ठरतात आणि काही वेळा जंगलातील आग भडकण्यास कारणीभूत ठरतात. एसव्हीटीची लक्ष्मण रेषा एक उत्तम पर्याय ठरला असल्याचा दावा सगुणा रुरल फाऊंडेशनकडून करण्यात आला आहे.
ओसाड व खडकाळ जागेवरील वाळा गवताची टिकाव शक्ती देणारे असते. वाळा गवताने त्याच्या उभ्या, खोल मुळांच्या प्रणालीमुळे, ओसाड खडकाळ जमिनीतसुद्धा विलक्षण टिकाव क्षमता सिद्ध केली आहे. त्याची अनुकूलता आणि टिकावूपणा यामुळे हे गवत डोंगराचे पुनरुज्जीवन प्रयत्नांमध्ये महत्त्वाचा घटक ठरला आहे.