| रायगड | खास प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील बिरवाडी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेला ग्रामस्थांनी टाळे ठोकले आहे. पूर्ण वेळ शिक्षकांची मागणी करुन देखील सरकारी यंत्रणा लक्ष देत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे हाल होत आहेत. संबंधीतांचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी हे अनोखे आंदोलन केल्याचे सांगण्यात आले.
शाळेत शिक्षण घेऊन मुलांचे भविष्य घडणार असते. यासाठी पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवतात. बिरवाडी प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग आहेत. तेथील विद्यार्थ्यांची संख्या 21 आहे. आधी एकच शिक्षक शिकवत होते. मात्र त्यानंतर शाळेला शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. पालकांसह ग्रामस्थांनी सदरची बाब गट शिक्षणाधिकारी धायगुडे यांच्या निर्दशनास आणून दिली. मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मागणी करुनही शिक्षक देण्यात येत नसल्याने ग्रामस्थांनी आणि पालकांनी शाळेला टाळे ठोकले. याबाबत धायगुडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.