| खोपोली | प्रतिनिधी |
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून खोपोली शहरातील कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा झाला.
महाराष्ट्र राज्य कुस्ती प्रशिक्षक संदीप वांजळे यांचे अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रमाणे प्रत्येकाने समर्पित भावनेने आणि खेळाशी समरस होऊन सराव करणे गरजेचे आहे असे सांगताना आगामी काळात होणार्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन जास्तीत जास्त पदक प्राप्त करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे लागेल असा आशावाद व्यक्त केला. कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती न्यासाचे अध्यक्ष राजाराम कुंभार, क्रीडा शिक्षक जगदीश मरागजे, खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे सदस्य गुरुनाथ साठेलकर, आंतरराष्ट्रीय खेळाडू विजेंद्र सिंग यांनीही यावेळी कुस्तीगीरांना मार्गदर्शन केले. कुस्ती प्रशिक्षक विजय चव्हाण, रायगड दिवेश पलांडे तसेच पूजा मरागजे, ज्योती शिंदे यंच्यासह पालकवर्ग देखील उपस्थीत होता. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडून आयोजित इंटर ट्रेनिंग सेंटर ट्रायलमध्ये राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार यावेळी करण्यात आला. वैष्णवी कुंभार, कनक मरागजे, सई शिर्के, राणी साहा, प्रणाली घनवट, आस्था मरागजे, राहुल पाईकराव या खेळाडूंनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. रोशनी परदेशी यांनी सूत्र संचालन तर प्रांजली कुंभारहीने आभार प्रदर्शन केले.