मनोज जरांगेंचा जोरदार हल्लाबोल
| बीड | प्रतिनिधी |
आपल्याला आरक्षणाची लढाई जिंकायची आहे. म्हणून या घोंगडी बैठकीचे आयोजन केले जात आहे. मराठ्यांना आरक्षण मिळणे गरजेचे आहे. आरक्षणापासून मराठ्यांचे एकही घर वंचित राहिले नाही पाहिजे. आपला लढा अंतिम टप्प्यात आणून ठेवला आहे. सरकारसमोर आता पर्याय नाही. माझा जीव आरक्षणात आहे तर सरकारचा जीव सत्तेत आहे, असा हल्लाबोल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी (दि. 8) सरकारवर केला. बीडमधील परळी वैजनाथ येथील घोंगडी बैठकीतून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरदेखील निशाणा साधला आहे.
जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, आपल्याला आरक्षण मिळालं नाही तर सरकारला सत्ता मिळू द्यायची नाही. देवेंद्र फडणवीसांनी सापळा रचला आहे. चार दिवसाला नवीन बैल येतो. मी फडणवीसांना एकच सांगतो, मराठ्यांचा नाद सोडून द्या, नाहीतर राज्यात भाजपा राहायचं नाही.
दरम्यान, थोड्याच दिवसात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. मराठा आरक्षणाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे आता निवडणुकीआधी राज्य सरकार काही निर्णय घेतयं का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
लाडकी बहीण योजनेवरून हल्लाबोल
जरांगे पाटील यांनी लाडकी बहिण योजनेवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, “तुम्ही तात्पुरत्या योजना कशा करता आणता? त्याऐवजी शेतकर्यांची कर्जमुक्ती करा, शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्यांना 24 तास लाईट द्या, जे पाहिजे ते सरकार देत नाही. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याऐवजी आयुष्यभराच्या सुविधा द्या.’’