11 सार्वजनिक, तर 27 हजार गणेशमूर्तींचे विसर्जन; गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण
| खास प्रतिनिधी | रायगड |
दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तीमय वातावरणात रविवारी (दि. 8) निरोप देण्यात आला. तब्बल 11 सार्वजनिक, तर 27 हजार गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. शनिवारी जिल्ह्यात गणेशोत्सवाला धूमधडाक्यात सुरुवात झाली. तब्बल एक लाख गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. परंपरेनुसार टाळ, मृदुंगाच्या गजरात दीड दिवसांच्या बाप्पाच्या मूर्तींचे विधीवत विसर्जन करण्यात आले.
बाप्पाच्या उत्सवाची चांगलीच धूम असल्याचे दिसून आली. शनिवारी बाप्पाचे आगमन झाले. त्यावेळी भक्तांनी विविध वाद्यांसह डिजेच्या तालावर नाचत बाप्पाला घरी आणले होते. आज दीड दिवसांचा पाहुणचार घेऊन बाप्पा आपल्या गावाला रविवारी निघून गेले. दुपारनंतर अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, रोहा, माणगाव, म्हसळा, तळा, महाड, श्रीवर्धन, पोलादपूर, सुधागड, मुरुड अशा 15 तालुक्यांत विसर्जनाची लगबग सुरु झाली होती. दीड दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर टाळ, मृदुंगाच्या गजरासह डिजे आणि ढोल-ताशांच्या तालावर दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला. समुद्रकिनारे, नदी, तलाव, कृत्रिम तलाव तसेच घरच्या घरी बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. भक्त गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडले होते. त्यांच्या चेहर्यावर उत्साह प्रचंड प्रमाणात ओसंडून वाहत असल्याचे दिसून आले.
मिरवणुकीत कोणी भजने गाऊन चांगलीच रंगत वाढवली. ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष सर्वत्र निनादत होता. त्यामुळे वातावरण चांगलेच भक्तीमय झाले होते. अलिबाग शहरामध्ये भक्तांच्या उत्साहाला चांगलेच उधाण आले होते. विसर्जनसाठी मोठ्या संख्याने समुद्रकिनारी, तलाव, नदी या ठिकाणी गर्दी झाली होती. सकाळपासून आकाशात चांगलेच धग दाटून आले होते. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीवर परिणाम होईल, अशी भीती भाविकांना वाटत होती. मात्र, दुपारनंतर आकाश मोकळे झाले आणि भक्तांना हायसे वाटले. चारचाकी वाहनांसह रिक्षा, टेम्पो तर कोणी बाप्पाची मूर्ती डोक्यावर घेऊन विसर्जन ठिकाणी नेत होते.
विसर्जन ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासानामार्फत करण्यात येते होते. विसर्जनाच्या ठिकाणी पालिकेने मदत केंद्र सुरु केले होते. ध्वनीक्षेपकावरुन सातत्याने सूचनांचे पालन करण्याचे आवाहन भक्तांना करण्यात येत होते.
अलिबाग शहरामध्ये समुद्रकिनारी विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अलिबाग पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेट्स लावले होते. तेथे विसर्जनसाठी येणारी वाहने, रुग्णवाहिका यांनाच प्रवेश देण्यात येत होता. अन्य वाहनांची वाहतूक नवीन पोस्ट ऑफिसमार्गे वळवण्यात आली होती.
समुद्रकिनारी भेळपुरी, पाणीपुरी, विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल दिसत होते. या ठिकाणी खवयांची गर्दी दिसून आली. प्रशासनासह विविध सामाजिक संस्थांनी निर्माल्य गोळा करण्यासाठी कलश ठेवेल होते.